हुकूमशाहीविरुद्ध लढणाऱ्या तरूणाईचा सन्मान

 


शहीद दिनानिमित्त पुण्यात आयोजन 

हुकूमशाही विरोधात लाखो तरुण उभे राहावेत: किरण माने 

पुणे : हुकूमशाहीविरुद्ध लढणाऱ्या तरूणाईचा  सन्मान  'बोल के लब आजाद है तेरे' या कार्यक्रमात   पुण्यात  करण्यात आला .दि.२३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता काँग्रेस भवन, शिवाजीनगर येथे भारत जोडो अभियान, पुणे आणि इंडिया आघाडी ,   युवक क्रांती दल, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, निर्भय बनो, जनसंघर्ष समिती, स्वराज अभियान, एनएस यु आय , राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (शरदचंद्र पवार), जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, अभ्यासिका विद्यार्थी कृती समिती या संस्था,संघटना आयोजनात सहभागी झाले.

 प्रसिध्द अभिनेते किरण माने,दिग्दर्शिका शिल्पा बल्लाळ,लेखक,अभ्यासक प्रा. डॉ. श्रीरंजन आवटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .

विविध आंदोलनातून हुकूमशाहीच्या विरोधात निर्भयपणे लढणाऱ्या अप्पा अनारसे,सचिन पांडुळे,भक्ती कुंभार,एड.बाळकृष्ण निढाळकर,वैभव कोठुळे, सायांतन चक्रवर्ती, रिताग्निक भट्टाचार्य, मधुरीमा मैती, मनकल्प नोकवोहम,निहारिका भोसले, श्रावणी बुवा, आकाश नवले,  प्रथमेश नाईक आणि आश्चर्या अशा अनेक युवा प्रतिनिधींचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात  आला. शेतकरी आंदोलन, ललित कला केंद्र हल्ला प्रकरण, निर्भय बनो सभा हल्ला प्रकरण, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हल्ला प्रकरण, फिल्म इन्स्टिट्युट हल्ला प्रकरण अशा ठिकाणी दडप शाही विरुद्ध लढणाऱ्या युवक , युवतींचा यात समावेश होता.

नीलम पंडित यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले. संदिप ताम्हणकर, इब्राहिम खान तसेच युवा आंदोलकांनी  मनोगत व्यक्त केले.  अशोक तातुगडे,  सुनील सुखथनकर , डॉ प्रवीण सप्तर्षी,अन्वर राजन, प्रशांत कोठडीया असे अनेक मान्यवर उपस्थित होते. एकनाथ पाठक यांनी आभार मानले.

यावेळी बोलताना किरण माने म्हणाले, ' ७० वर्ष भारतीय कंदमुळं खावून जगत होते, असा समज करून दिला जातो.  २०१४ नंतर हवेत ऑक्सिजन वाढला ,असा समज करून दिला जातो.मात्र,मोदी हे अवतारी पुरुष असल्याने त्यांनी चहा विकलेले रेल्वे स्टेशन सापडत नाही, डिग्री सापडत नाही . याच काळात माणसाचा गुलाम होण्याची प्रक्रिया झाली. मेंदूवर कब्जा घेण्यात आला आहे. या अराजक काळात जे दोन हात करतील त्यांचे नाव इतिहासात लिहिले जाईल. म्हणूनच आज होत असलेल्या सत्काराचे महत्व आहे.

आपण देश वाचविण्यासाठी झटले पाहिजे. कलाकारांनी राजाचे भाट बनू नये. किरण माने दडपशाहीच्या विरोधात उभे राहिले म्हणून संपले, असे उदाहरण सेट करण्याचा प्रयत्न झाला. मात्र मी संपलो नाही, म्हणून लढा देणाऱ्या कोणीही घाबरु नये. हुकूमशाही विरुद्ध लढणारे लाखो निर्माण व्हावेत, असेही ते म्हणाले.

 शिल्पा बल्लाळ म्हणाल्या,'  भगतसिंग यांनी केलेला स्फोट हिंसक नव्हता.  ती पहिली वहिली अभिव्यक्ती होती.   आज आपला लढा स्वातंत्र्य लढ्यासारखा आहे.  तरुण मंडळींनी हा लढा पुढे न्यायचा आहे. कलाकारांनी हिंसक अभिव्यक्ती पेक्षा सकारात्मक अभिव्यक्ती करावी. अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वव्यापी असली पाहिजे.गोडसेची अभिव्यक्ती हवी की गांधीजींची अभिव्यक्ती हवी, हे ठरवण्याची वेळ आली आहे.

श्रीरंजन आवटे म्हणाले, 'देशाची स्थिती बिकट आहे. त्याविरुद्ध लढा देण्याची शपथ आजच्या शहीद दिनी घेतली पाहिजे.संविधानाचा वारसा नाकारण्याचा प्रयत्न होत आहे. संविधान बदलण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न लपलेला नाही.ध्रुवीकरणाच्या द्वारे विखार पसरवला जात आहे. या लढाईत द्वेष जिंकणार नाही, तर प्रेम जिंकणार आहे'.

हुकूमशाहीविरुद्ध लढणाऱ्या तरूणाईचा सन्मान हुकूमशाहीविरुद्ध लढणाऱ्या तरूणाईचा  सन्मान Reviewed by ANN news network on ३/२३/२०२४ ०८:५३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".