शहादा येथील खुन्यांना मुंबई येथे अटक
मुंबई : जावयाने दिलेल्या सुपारीमुळे एका व्यक्तीचा खून करून शहादा, जि. नंदूरबार येथून पसार झालेल्या चौघांना मुंबई पोलिसांच्या गुन्हेशाखा कक्ष ११ च्या पथकाने ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे. यापैकी दोघे अल्पवयीन आहेत.
निलेश बच्चू पाटील, वय २५ वर्षे,लकी किशोर बिरारे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
शहादा येथील राजेंद्र उत्तमराव मराठे हे ५३ वर्षांचे गृहस्थ बेपत्ता असल्याची तक्रार त्यांची पत्नी मिनाक्षी राजेंद्र मराठे, वय ५० यांनी १४ मार्च रोजी शहादा पोलीसठाण्यात नोंदविली होती. त्यानंतर १६ मार्च रोजी पोलिसांना नांदर्डे ते तळोदा रोडवर अर्धवट जळालेल्या अवस्थेतील एक मृतदेह आढळला होता. तो राजेंद्र मराठे यांचाच असल्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी २२९/२४ क्रमांकाने भा.दं.वि. कलम ३०२,२०१ अन्वये गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना या गुन्ह्यातील संशयित आरोपी मुंबईकडे पसार झाल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी या बद्दल मुंबई पोलिसांच्या गुन्हेशाखा कक्ष ११ ला कळविले.
मुंबई पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करत या संशयितांना पेप्सी ग्राउंडसमोर, गोराई नं २, बोरीवली (प.)मुंबई येथून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी राजेंद्र मराठे यांच्या खुनाची सुपारी त्यांचा जावई गोविंद सुरेश सोनार, वय ३५ वर्षे याने दिल्याची कबुली दिली. गोविंद सोनार याने ३ लाख रुपये हा खून करण्यासाठी दिले असल्याचे आरोपींनी सांगितले. आरोपींकडून पोलिसांनी ६ मोबाईल जप्त केले आहेत त्यापैकी १ मृताचा आहे. एका मोबाईलमध्ये खून करताना आणि पुरावा नष्ट करताना तयार केलेली व्हिडिओ क्लिप पोलिसांना आढळली आहे.
सर्वांना नंदूरबार पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई,विवेक फणसळकर, विशेष आयुक्त, देवेन भारती, सहआयुक्त (गुन्हे),लखमी गौतम,अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शशिकुमार मीना, उपआयुक्त (प्र-१), विशाल ठाकूर, सहाय्यक आयुक्त (प्रकटीकरण-उत्तर),महेश देसाई यांच्या मागदर्शनाखाली व वरिष्ठ निरीक्षक, विनायक चव्हाण यांच्या निर्देशानुसार निरीक्षक भरत घोणे, सहायक निरीक्षक अभिजीत जाधव, सहायक निरीक्षक यादव, उपनिरीक्षक शिंदे,कांबळे, मेतर, सहायक फौजदार नाईक, हवालदार गायकवाड, नावगे,खांडेकर, सावंत, कदम, खताते, शिपाई देशमुख, शेख, गोसावी यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
३/२०/२०२४ ०९:२८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: