शुक्रवार, १५ मार्च, २०२४

प्रियकराला करायला लावली पतीची हत्या!; महिला, तिचा प्रियकर आणि त्याचा साथीदार अटकेत!!

पिंपरी :  पिंपरी चिंचवड शहरातील आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंबळी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पत्नीने आपल्या  सैनिक प्रियकराच्या सहाय्याने पतीची हत्या केली. राहुल सुदाम गाडेकर असे मृत ३६ वर्षीय तरुणाचे नाव आहे. या खून प्रकरणात पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने त्याची पत्नी सुप्रिया राहुल गाडेकर हिला अटक केली आहे.

सैनिक सुरेश मोटाभाऊ पाटोळे आणि त्याचा सहकारी रोहिदास नामदेव सोनवणे यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. राहुल गाडेकर यांची पत्नी सुप्रिया गाडेकर ती न-हे येथे असलेल्या नवले रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती. तिने कोरोनाच्या काळात अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा येथे लॅब सुरू केली होती. ही लॅब चालवत असताना तिचे भारतीय लष्करातील  सुरेश मोटाभाऊ पाटोळे यांच्याशी विवाहबाह्य संबंध निर्माण झाले होते. ही बाब राहुल गाडेकर यांना समजली आणि सुप्रिया आणि राहुलमध्ये सतत वाद सुरू झाले. त्यामुळे सुप्रियाने सुरेश पाटोळे आणि त्याचा मित्र रोहिदास सोनवणे याच्या मदतीने तिने आपल्याच पतीच्या हत्येचा कट रचला.

राहुल गाडेकर याला ठार मारण्यासाठी सुरेश पाटोळे याने संगमनेर तालुक्यातील चिंचपूर गावात दोन लोखंडी हातोडे विकत घेतले होते. राहुल गाडेकर यांनी एक कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स घेतल्याची माहिती राहुल गाडेकर यांच्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला होती. त्यामुळे राहुल गाडेकर यांच्या मृत्यूनंतर सुप्रिया आपल्याला मिळणार्‍या रकमेपैकी निम्मी रक्कम सुरेश पाटोळे आणि रोहिदास गाडेकर यांना देणार होती. त्यामुळे सुरेश पाटोळे आणि रोहिदास घाडगे यांनी राहुल गाडेकर चाकण येथील त्यांच्या कंपनीत कामाला जात असताना मागून त्याच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने प्रहार करून त्यांची हत्या केली. राहुल गाडेकरची हत्या केल्यानंतर सुरेश पाटोळे नोकरीसाठी हैदराबाद येथील प्रशिक्षण केंद्रात रुजू झाला, तर रोहिदास घाडगे हा संगमनेर तालुक्यातील चिंचपूर गावात आपल्या घरी गेला. आता या हत्येतील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सुप्रियाला १८ मार्च पर्यंत तर, सुरेश आणि रोहिदास यांना १९ मार्चपर्यंत पोलीसकोठडी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा