शिवसेनेच्या ८ उमेदवारांची पहिली यादी घोषित
ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या आठ उमेदवारांची पहिली यादी घोषित करण्यात आली आहे. यामध्ये मावळसाठी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून आता शिवसेनेचे श्रीरंग बारणे विरुद्ध शिवसेना (उबाठा)चे संजोग वाघेरे यांच्यात थेट लढत होणार असे चित्र या घडीला निर्माण झाले आहे.
श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे हे दोघेही पिंपरी चिंचवडचे रहिवासी आहेत. दोघांचीही राजकीय कारकिर्द पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरसेवक पदापासून सुरू झाली आहे. दोघेही पिंपरी चिंचवड महापालिकेतील थेरगाव आणि पिंपरी या गावातील मूळचे रहिवासी आहेत. आजवर येथे महापालिकेच्या आणि काही अंशी अन्य निवडणुकांमध्ये गावकी आणि भावकीचे राजकारण चालत आले आहे. आता हे दोन्ही स्थानिक उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले असल्याने गावकीच्या राजकारणात जो बाजी मारेल तो पिंपरी चिंचवडमधून मताधिक्य घेईल अशी स्थिती आहे.
चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासह भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप हे वजनदार नेते आपली ताकद बारणे यांच्यामागे खरोखरच उभी करतात का? या प्रश्नाच्या उत्तरात विजयी कोण होणार याचेही उत्तर दडलेले आहे. भारतीय जनता पक्षाला यावेळी कोणत्याही परिस्थितीत केंद्रात सत्ता हवी आहे. त्यासाठी संबंधितांना ’नीट’ काम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असल्याचे समजते. जर युतीच्या उमेदवाराला दगाफ़टका झाला तर त्यात दोषी आढळलेल्याची गय केली जाणार नाही असा संदेशही सर्वांना देण्यात आला असल्याचे कळते. या भागातून जो कोणी मताधिक्य घेईल त्याची विजयाकडे वाटचाल सुरू होईल असे सध्याचे चित्र आहे. खासदार बारणे यांनी आपली उमेदवारी निश्चित आहे हे गृहीत धरून मागील सहा महिन्यांपासून मतदारसंघात संपर्क वाढवला होता. मधल्या काळात भाजप, राष्ट्रवादी या पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या मतदारसंघावर दावा सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता बारणे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्याने ते निश्चिंत झाले आहेत.
संजोग वाघेरे हे मूळचे राष्ट्रवादीचे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पिंपरी चिंचवडमधील बहुतेक बलवान स्थानिक नेते अजित पवार यांच्यासोबत गेले. त्यात वाघेरेही होते. लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार आणि ही उमेदवारी विद्यमान खासदार म्हणून बारणे यांना मिळणार याचा अंदाज आल्यानंतर वाघेरे यांनी राष्ट्रवादीतून शिवसेना (उबाठा) मध्ये उडी मारून आपले तिकिट पक्के केले. त्यांनीही मतदारसंघात फिरण्यास सुरुवात केली आहे.घाटमाथ्याखालील कोकणपट्टा उबाठा गटाला अनुकूल राहिल असा अंदाज बांधून वाघेरे यांनी शिवसेना (उबाठा) मध्ये प्रवेश केला आहे. त्यांनीही मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत. घाटाखालील भागात ते नवखे आहेत. त्यांना त्याभागावर अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये पुणे जिल्ह्यामधील चिंचवड, पिंपरी व मावळ तर रायगड जिल्ह्यामधील कर्जत, उरण व पनवेल असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. या लोकसभा मतदारसंघांमधील मतदार संख्या ही जवळपास २५ लाख आहे. १३ मे रोजी येथे मतदान होणार आहे.
थेट लढत होणार असल्याने येथील निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र सध्यातरी आहे.
उमेदवारी जाहीर होताच श्रीरंग बारणे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या बंगल्यासमोर व कार्यालयासमोर आनंद साजरा केला. मावळ लोकसभा मतदारसंघात दहा वर्षात केलेल्या विकासकामांमुळे मावळचा मतदार पुन्हा एकदा मला साथ देईल, असा विश्वास बारणे यांनी व्यक्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: