बहुजन मुक्ती पार्टी 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' मध्ये विलीन

 


बाळासाहेब मिसाळ-पाटील आणि संतोष घरत यांच्या नेतृत्वाखाली  पक्षप्रवेश 
 
विठ्ठल ममताबादे

उरण : मुंबई येथील बॅलॉर्ड इस्टेटमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात खासदार शरदचंद्र पवार  यांच्या नेतृत्वाखालील 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' या पक्षात बामसेफ प्रणित बहुजन मुक्ती पार्टीचे माजी राष्ट्रीय महासचिव आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ-पाटील आणि बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा कामगार नेते संतोष घरत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यातील सर्वच प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश अत्यंत उत्साहात आणि मोठ्या दिमाखात  झाला. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड, प्रदेश सरचिटणीस, कोकण प्रभारी प्रशांत पाटील,  प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार, चंद्रपूरचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला विभागीय अध्यक्षा भावना घाणेकर आणि नवी मुंबई पदवीधर सेल जिल्हाध्यक्ष ॲड अरविंद माने  उपस्थित होते.


 शरदचंद्र पवार साहेब  नेतृत्वाखाली शुक्रवार, दिनांक १५ मार्च, २०२४ रोजी झालेल्या चर्चेनंतर 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' या पक्षात विलीनीकरण करत आम्ही पुरोगामी विचारसरणीसोबत म्हणजेच  शरदचंद्र पवार साहेबांसोबत आहोत असे जाहिर करुन सर्वांनी समर्थन व्यक्त केले. महाराष्ट्रातील सर्वच प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यालय तुडुंब भरले होते.

या कार्यक्रमाचे स्वागत अणि प्रास्तविक बहुजन मुक्ती पार्टीचे माजी कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र इंगोले यांनी केले. यानंतर राष्ट्रीय लिंगायत मोर्चाचे लातूर जिल्हाध्यक्ष सत्यनारायण बिराजदार, छत्रपती क्रांती सेनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी तुषार वाघ, सांगली लोकसभा निवडणूक लढवलेले उमेदवार, इंडियन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी डॉ.राजेंद्र कवठेकर, भारती विद्यार्थी मोर्चाचे महासचिव मनोहर वाघ, हातोळण औरंगपूरच्या सरपंच कु.भारती मिसाळ, भारतीय जनता पार्टीतून राजीनामा देऊन आलेले भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य, राज्याचे धर्माचार्य सहसमन्वयक, अध्यात्मिक आघाडीचे जिंतूर-सेलू विधानसभा अध्यक्ष ह.भ.प.कैलास महाराज देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस-रायगड प्रभारी-कोकण संपर्कप्रमुख प्रशांत पाटील, बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष, कामगार नेते संतोष घरत आणि बहुजन मुक्ती पार्टीचे माजी राष्ट्रीय महासचिव आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ पाटील यांची आपल्या खास शैलीत तडाखेबाज भाषणे झाली.

या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला. त्यांनी आपल्या भाषणात बाळासाहेब मिसाळ पाटील आणि कामगार नेते संतोष घरत यांच्या सामाजिक आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या संघटनात्मक राजकीय कार्याचा आढावा घेऊन त्यांचे कौतुक केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरोगामी विचारांची पार्टी असून आज पक्षप्रवेश होत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा येथे मानसन्मान होईल. त्यांना आदराचे स्थान मिळेल असे सांगितले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या प्रचारामध्ये जनसमुहाच्या लोकभाषेत ह.भ.प.कैलास देशमुख महाराजांच्या दृष्टातांच्या लोकप्रबोधनाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे माजी राष्ट्रीय महासचिव आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ-पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ¨प्रदेश उपाध्यक्ष पदी आणि बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा कामगार नेते संतोष घरत यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाल्याचे नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या शुभहस्ते महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आलेल्या महिला आणि पुरुष पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सन्मान सोहोळा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी श्रीमती रचना वैद्य यांची 'महाराष्ट्र राज्याच्या प्रवक्त्या पदी', कैलास गायकवाड यांची 'व्यसनमुक्ती झोनच्या उपाध्यक्ष' पदी आणि सदानंद येलवे यांची 'सामाजिक न्याय रायगड जिल्हाध्यक्ष' पदी निवड झाली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ट्रेड युनियनचे महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अध्यक्ष-सांगलीचे शितल खाडे यांनी केले.
बहुजन मुक्ती पार्टी 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' मध्ये विलीन बहुजन मुक्ती पार्टी 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' मध्ये विलीन Reviewed by ANN news network on ३/२५/२०२४ १२:१०:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".