नवी मुंबई : सिडको नैना परिक्षेत्रातील गावांना एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन विनियमावली (युडीसीपीआर) लागू करण्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन रायगड आणि रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी आज दिले.
आज कोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालयात नैना परिक्षेत्रातील समस्यांबाबत सर्व पक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीस आ.महेश बालदी, आ.प्रशांत ठाकूर, आ.बाळाराम पाटील, श्री.जी.एम.म्हात्रे, बबन पाटील, रामदास शेवाळे, अरुणशेठ भगत आणि संबंधित शासकीय अधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव क्षेत्राकरीता नैना विशेष नियोजन प्राधिकरण सिडकोने निर्माण केले आहे. या अधिसूचित क्षेत्रात पनवेल, उरण व पेण तालुक्यातील 175 गावांचा समावेश आहे. सदर नैना अधिसूचित क्षेत्रामध्ये 23 गावांची अंतरीम प्रारुप विकास योजना शासनाने यापूर्वीच मंजूर केली आहे. उर्वरित 152 गावांची प्रारुप विकास योजना 16 सप्टेंबर,2022 रोजीच्या अधिसूचनेनुसार मंजूर झाली आहे. नैना परिक्षेत्रात युडीसीपीआर लागू झाल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील. असेही ना.उदय सामंत यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या विविध प्रश्नांबाबत बैठक
उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांच्या उपस्थित आज कोकण भवन येथे महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग विकास महामंडळाच्या विविध प्रश्नांबाबत खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष श्री.रविंद्र साठे यांच्या उपस्थितीत विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेअंतर्गत खादी ग्रामोद्योग मंडळाच्या हात कागद संस्था,पुणे यासाठी 1 कोटी रुपये आणि खादी भवनाच्या इमारत दुरुस्तीसाठी 2 कोटी रुपये अनुदान देण्याला ना.सामंत यांनी तत्वत: मान्यता दिली. विश्वकर्मा योजना ग्रामीण भागापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून घोषित करणार असल्याचे ना.सामंत यांनी सांगितले. यंदा महाबळेश्वर परिसरात ‘कारवी’ मध उपलब्ध होणार असून या मधाच्या मार्केटिंगसाठी स्वतंत्र योजना करण्यावरही विचार करण्यात आला. खादीग्रामोद्योग मंडळाची रिक्त पदे भरणे, खादी ग्रामोद्योग मंडळाच्या विविध उत्पादनाची विक्री आणि त्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणारा मॉल याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
महात्मा फुले सामाजिक प्रबोधन व परिवर्तन प्रतिष्ठान, मु.पो.जासई ता.उरण जि.रायगड यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक झाली. संस्थेचे अध्यक्ष श्री.अतुल पाटील आणि संचालक उपस्थित होते. त्यांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक विचार करेल असे ना.उदय सामंत यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: