रत्नागिरी नगरपरिषदेच्यावतीने उभारण्यात आलेल्या श्री विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण; जिल्हावासियांनी अनुभवलं हिरा आणि मोती अश्वांचं रिंगण (VIDEO)
रत्नागिरी : रत्नागिरीतील शिर्के उद्यानात नगरपरिषदेच्यावतीने उभारण्यात आलेल्या श्री विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण सोमवारी झाले. यानिमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि तीन हजार वारकर्यांचा मेळा रत्नागिरीत जमला होता. श्रीमंत सरदार शितोळे यांनी माऊलींच्या सेवेसाठी अर्पण केलेल्या मानाच्या हिरा आणि मोती अश्वांचा रिंगण सोहळा रत्नागिरीकरांनी अनुभवला.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला संत साहित्य संमेलनाध्यक्ष माधव महाराज शिवणीकर, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, बापूसाहेब महाराज देहूकर, निवृत्ती महाराज नामदास, श्रीमंत सरदार उर्जितसिंह राजे शितोळे, मनोहर महाराज औटी, देवीदास महाराज ढवळीकर, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित होते.
प्रथम पालकमंत्री श्री. सामंत यांनी उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर कोनशिलेचे अनावरण केले. संमेलनाध्यक्ष हभप शिवणीकर महाराज यांच्या हस्ते कळ दाबून श्री विठ्ठल मूर्तीचे अनावरण सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी माऊलींच्या नामाचा एकचा जयघोष झाला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचाही जयजयकार झाला. फटाक्यांची नेत्रदीपक आतषबाजी करण्यात आली.
पालकमंत्री श्री. सामंत यावेळी म्हणाले, आज वारकऱ्यांच्या हस्ते झालेला सत्कार हा आजवरचा सर्वात मोठा आहे. त्याला गालबोट लागेल असे कृत्य माझ्या हातून होणार नाही. वारीनंतर येथे अश्व आला, रत्नागिरीत पहिले रिंगण झाले. वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला संस्कार दिले. महाराष्ट्र घडवला. तमाम वारकऱ्यांचे श्रध्दास्थान असणाऱ्या माऊलींचे सदैव स्मरण होण्यासाठी ही मूर्ती इथे उभारण्यात आली आहे. आजच्या सोहळ्यानं वारी केल्याचे भाग्य मला मिळाले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असताना पैठणला संतपीठ करता आले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा केली असून, पंढरपूर मंदिर अॕक्टमधील संतपीठ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: