पुणे : पुणे महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त दि. १० आणि ११ फेब्रुवारी रोजी ४२ वे फळे, फुले व भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शन छत्रपती संभाजीराजे उद्यान, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन १० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांच्या हस्ते होणार आहे. प्रदर्शन नागरिकांसाठी विनामूल्य खुले असून याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पालिकेचे मुख्य उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे यांनी केले आहे.
पुणे महापालिकेच्यावतीने दरवर्षी असे प्रदर्शन आयोजित करण्यात येते. या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एकूण १२ विभाग असून,२१६ उपविभाग आहेत. त्यामध्ये शोभिवंत पानाफुलांच्या कुंड्यांची मांडणी, औषधी वनस्पतींचा संग्रह, गुलाबपुष्पांची मांडणी, हंगामी फुले, टेबल सजावट, वेगवेगळ्या प्रकारची फुले, भाजीपाला, सॅलेड सजावट, बचत गटातील महिलांसाठी, फळे, भाजीपाल्यावर प्रक्रिया करून तयार केलेले पदार्थ, विविध प्रकारचे हार, पुष्पगुच्छ, शिंपले, वेण्या, गजरे, प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. विविध प्रकारचे डेलिया, आर्किड, ॲन्थूरीअम, जरबेरा, गुलाब, कार्नेशन आदी हंगामी तसेच बहुवार्षिक फुलझाडे या प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण आहे.
या प्रदर्शनामध्ये प्रामुख्याने, पुणे विद्यापीठ, मेट्रो, नदी सुधारणा प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, एन.डी.ए., सी.एम.ई, वन विभाग, पुणे सर्प विज्ञान संस्था, राजीव गांधी प्राणी संग्रहालय, पर्यावरण केंद्र, पुष्करणी उत्तरा पर्यावरण केंद्र,लोणावळा,टिळक आयुर्वेद महाविद्यालय फ्रेंडस ऑफ बोन्साय, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आदी संस्था सहभागी होणार आहेत.
प्रदर्शनामध्ये फुले, फळे, वृक्षांची रोपे, बागकाम साहित्य, बी बियाणे, खते यांचे विक्रीचे स्टॉल असणार आहेत. नागरिकांना १० व ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ८.३० पर्यंत विविध बाग विषयक साहित्य खरेदी करता येईल.
प्रदर्शनानिमित्ताने घेणेत आलेल्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता छत्रपती संभाजीराजे उद्यानात आयोजित करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: