ईव्हीएम कंट्रोल युनिट चोरी प्रकरण भोवले!
पुणे : सासवड, जि.पुणे येथील पुरंदरचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपी यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. सासवड तहसील कार्यालयात जनजागृतीसाठी ठेवलेले ईव्हीएम कंट्रोल युनिट चोरीचे प्रकरण या अधिकार्यांना भोवले आहे. कामात हलगर्जी केल्याचा ठपका या अधिकार्यांवर ठेवण्यात आला आहे.
दरम्यान ईव्हीएम कंट्रोल युनिट चोरणार्या दोघांना अटक करून त्यांच्याकडून युनिट हस्तगत करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. भय्या ऊर्फ शिवाजी रामदास बंडगर, वय २१ व अजिंक्य राजू साळुंखे, वय २१ रा. माळशिरस ता.पुरंदर, जिल्हा पुणे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून १ कंट्रोल युनिट, ५ पेपर रीम आणि स्टेशनरी हस्तगत करण्यात आली आहे. ही माहिती अपर मुख्य सचिव तथा राज्याचे निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
सासवड तहसील कार्यालयात जनजागृतीसाठी ठेवलेल्या ईव्हीएमपैकी एक कंट्रोल युनिट (BCUEL४१६०१) ३ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी सहा ते ५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० दरम्यान चोरीला गेल्याचे निदर्शनास आले होते. निवासी नायब तहसीलदार, पुरंदर यांनी सासवड पोलिस स्टेशनमध्ये यासंदर्भात ५ फेब्रुवारी २०२४ रोजी तक्रार दाखल केली. त्यावरून गुन्हा दाखल करुन तपास सुरू करण्यात आला. पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले.
तथापि, भारत निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली असून, सुरक्षा व्यवस्थेतील कमतरता विचारात घेऊन, पुणे जिल्हयातील उपविभागीय अधिकारी, पुरंदर, तहसीलदार, पुरंदर तसेच संबंधित उपविभागीय पोलिस अधिकारी यांना तत्काळ निलंबित करुन पुढील चौकशी करण्याचे आदेश ६ फेब्रुवारी २०२४ रोजी दिले आहेत. तसेच या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचे सुध्दा निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही सुरु असल्याची माहिती श्री. देशपांडे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: