राज्यातील ४० गोशाळांसाठी 'स्मार्ट गोशाळा' प्रकल्प

 


१७ फेब्रुवारी रोजी राज्य शासनाचा केंद्राबरोबर करार

पुणे : देशी गोवंशाच्या जतनाचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून अनेक चांगल्या योजना हाती घेतल्या जात आहेत. राज्यातील ४० गोशाळा स्मार्ट गोशाळा म्हणून विकसित केल्या जाणार असून केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहाय्यातून हा स्मार्ट गोशाळा प्रकल्प साकारणार आहे. त्यासंबंधीचा सामंजस्य करार १७ फेब्रुवारी रोजी केला जाणार असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी गुरुवारी दिली.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे टेक्निकल इन्स्टिट्यूट पुणे आणि मोरोपंत पिंगळे गोधन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमधील सावरकर सभागृहात 'गाईच्या शेणापासून रंगनिर्मिती' या विषयावर एक दिवसाच्या तांत्रिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. रा. स्व. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक प्रा. सुरेश उर्फ नाना जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, सदस्य जगदीश कदम, डॉ. रवींद्र आचार्य, खेमराज रणपिसे, कार्यवाह धनंजय कुलकर्णी, गोसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष मयुरेश जोगदेव यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

महाराष्ट्रातील गोवंशाची संख्या एक कोटी ३९ लाख एवढी असून त्यातील देशी गोवंशाची संख्या १३ लाख आहे. या देशी गोवंशाचा सांभाळ करतानाच एकही गाय कत्तलखान्यात जाणार नाही, हे लक्ष्य ठेऊन गोसेवा आयोगाचे काम सुरू आहे. राज्यात १,०६८ गोशाळा आहेत आणि त्यातील ४० गोशाळा अशा आहेत की ज्यामध्ये एक हजारपेक्षा अधिक गायींचा सांभाळ केला जात आहे. या गोशाळा स्मार्ट गोशाळा म्हणून विकसित केल्या जाणार असून तेथील गायीच्या शेणापासून सीएनजीची निर्मिती करण्याची योजना हाती घेतली जाणार आहे, अशी माहिती मुंदडा यांनी दिली.

केंद्र सरकार बरोबर या संबंधीचा करार १७ फेब्रुवारी केला जाईल. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडून त्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध होणार असल्याचे सांगून मुंदडा म्हणाले, गायीचे शेण आणि गोमूत्राचा वापर, त्यापासून उत्पादने तयार करणे या क्षेत्रात क्रांती होणे आवश्यक असून तसे झाले तर देशी गायी वाचवण्यात यश येईल.

पाश्चात्यांच्या अंधानुकरणामुळे आपण प्रकृतीचे दोहन करण्याचा विचार विसरलो आणि शोषण सुरू झाले. हिंदू संस्कृतीच्या दोहन विचारांमध्ये गोविज्ञान होते. मात्र तो विचार मागास ठरवला गेला. त्यामुळे गोविज्ञानाच्या विचाराचे समाजात जागरण करण्याची आवश्यकता होती. हे काम आता सर्वत्र सुरू झाले आहे. गोसेवा करणारे, गोपालन करणारे, गायीचे शेण आणि गोमूत्रापासून उत्पादने तयार करणारे आणि त्यांचा वापर करणारे अशा सर्व घटकांना एकत्र आणून सहचिंतन करावे, असे प्रा. जाधव म्हणाले.

आपल्या पूर्वजांनी आपल्याला विवेकाचा विचार शिकवला आहे. निसर्गाशी दोस्ती करून आपण जगू शकतो. त्यामुळेच दूध न देणाऱ्या गायीला जगवणारेही हजारो शेतकरी आहेत आणि गायींचा असा सांभाळ फक्त आपल्याच देशात होतो, असे रावत म्हणाले.

हिंदू संस्कृतीमध्ये संपूर्ण जीवन हे गायीच्या आधारे उभे आहे. गायीच्या शेणापासून तसेच गोमूत्रापासून विविध उत्पादने तयार होणे, तसेच औद्योगिक उत्पादने तयार होणे आवश्यक आहे. त्यासाठी संशोधन करणाऱ्यांना एकत्र आणणे, त्यांना सुविधा पुरवणे अशाप्रकारचे काम गोधन फाऊंडेशन करत असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

राज्यातील ४० गोशाळांसाठी 'स्मार्ट गोशाळा' प्रकल्प राज्यातील ४० गोशाळांसाठी 'स्मार्ट गोशाळा' प्रकल्प Reviewed by ANN news network on २/१५/२०२४ ०७:४८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".