क्रिकेट स्पर्धेतून मिळालेली सर्व रक्कम अपघातग्रस्तांसाठी वापरणार
विठ्ठल ममताबादे
उरण : न्हावा शेवा सीएचए आधार सामाजिक संस्था ही कस्टम हाऊस एजेंट(CHA )व्यक्तींनी एकत्र येत स्थापन केलेली सामाजिक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून अपघात ग्रस्त व्यक्तींना व अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तींना मदत करण्यात येते.अपघात ग्रस्त व्यक्तींना व मृत्यू पावलेल्या व्यक्तींना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने व निधी गोळा करण्याच्या उद्देशाने दरवर्षी उरण तालुक्यात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.यंदाही अक्कादेवी मैदान, मोठी जुई, उरण येथे सीएचए आधार चषकाचे आयोजन करण्यात आले होते.
याचा उदघाटन सोहळा श्री साई देवस्थान वहाळचे संस्थापक अध्यक्ष रवि पाटील,राजू मुंबईकर,उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष भारत भोपी,पनवेल दुंदरे ग्रूप ग्रामपंचायतीचे सदस्य विश्वास पाटील सामाजिक कार्यकर्ते नारायण माने, काँग्रेसचे उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांच्या हस्ते झाला.
सी.एच.ए. आधारचषक सोहळ्यास तब्बल चारशेपेक्षा जास्त मान्यवर उपस्थित राहिले.अंबा शिपिंगचे मालक हिरालाल डागा,जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रितम म्हात्रे, उरणचे ग्रूप अध्यक्ष बाळू फडके,नरेंद्र मुंबईकर, सूरज म्हात्रे, विनोद म्हात्रे, रुपेश पाटील, सत्यवान भगत, कौशिक ठाकूर,दिपक पाटील,श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील,कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे,न्हावा शेवा सीएचए आधार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश भगत आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करत वाहतुकीच्या नियमांची माहिती दिली. सर्वांना नियम पाळण्याचे आवाहन केले.
या आधार चषक प्रतियोगीतेत खेळण्याकरीता संघटनेतीलच ११ उत्कृष्ट क्रिकेटर सी.एच.ए.बांधव आपल्या स्वतःच्या खिशातून पैसे काढून स्वतःच आपली क्रिकेट टीम तयार करून प्रत्येक संघमालक त्याचं प्रतिनिधित्व करत असतात. अशाप्रकारे या वर्षी १० टीमच्या सहभागातून खेळवल्या जाणाऱ्या आधारचषक प्रतियोगीतेत प्रथम क्रमांक विजेत्या संघाला रोख रक्कम पन्नास हजार रुपये आणि ट्रॉफी तर द्वितीय क्रमांक विजेत्या संघास पंचवीस हजार रुपये आणि ट्रॉफी बक्षीस दिली जाते.पण यात पण सी. एच. ए. बांधवांच्यां मनाचं मोठेपण दिसून येतोय कारण विजेता आणि उपविजेता संघाचे संघ मालक या बक्षीस रूपातील रक्कमेतुन फक्त आणि फक्त अकरा रुपये घेऊन उर्वरित पूर्ण रक्कम ही संघटनेला दान स्वरूपात देऊन आपलं उत्तरदायित्व जपतात.
या प्रतियोगितेच्या अंतिम फेरीत अर्णव अँड मोक्ष आणि वेद फायटर्स या संघांनी धडक मारली तर अंतिम अंतिम सामन्यात या प्रतियोगीतेचा विजेता संघ ठरला तो अर्णव अँड मोक्ष हा संघ तर उपविजेता वेद फायटर्स संघ ठरला.या प्रतियोगितेत मालिकावीर या पुरस्काराचा मानकरी ठरला तो २६ चेंडूत १०६ धावा आणि १ विकेट अशी अष्टपैलू कामगिरी करणारा गोवठणे गावचा अष्टपैलू खेळाडू रोहित पाटील तर उत्कृष्ट फलंदाज ठरला तो गोवठणे गावचा अभिजित गावंड आणि उत्कृष्ट गोलंदाज या पुरस्काराचा मानकरी ठरला तो पिरकोन गावचा प्रशांत गावंड तर उकृष्ट क्षेत्ररक्षक ठरला तो सारडे गावचा सुभाष पाटील.
या कार्यक्रमा करिता गोवठणे विकास मंचचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध समालोचक सुनिल वर्तक यांनी संपूर्ण दिवसभर सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आपल्या बहारदार सूत्रसंचालनाने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.तर सुप्रसिद्ध निवेदक नितेश पंडित आणि जीवन डाकी यांनीही सुंदर असे निवेदन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: