५ कोटींचे मेफेड्रोन जप्त!, तिघे अटकेत!!
पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ ने मेफेड्रोन हा अमलीपदार्थ विकणार्या तिघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून सुमारे ५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांनी हे मेफेड्रोन परदेशी नागरिकाकडून घेतले असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या अमलीपदार्थ तस्करी प्रकरणात आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.
पुणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईत वैभव उर्फ पिंटया भारत माने,अजय अमरनाथ करोसिया, वय ३५ वर्षे, रा. पुणे आणि हैदर नूर शेख, वय ४० वर्षे रा. विश्रांतवाडी, पुणे यांना पोलिसांनी अटक केली असून मेफेड्रोन पुरविणार्या परदेशी नागरिकाचा शोध जारी आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने १९ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास ही कारवाई केली. पथकाचे वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद आणि त्यांचे सहकारी सोमवारपेठ परिसरात गस्त घालत असताना त्यांना एक संशयास्पद एर्टिगा कार दिसली.तिच्या ड्रायव्हींग सीट शेजारच्या सीटवर बसलेला तरूण वैभव उर्फ पिंटया भारत माने हा दाखलेबाज गुन्हेगार असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी त्याची चौकशी केली असता त्याचे बोलणे संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी गाडीची झडती घेतली.त्यावेळी ड्रायव्हरसीट शेजारी बसलेल्या त्या तरुणाकडे १ कोटी रुपये किमतीचे ५०० ग्रॅम मेफेड्रोन आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी वैभव मानेसह कारचालक अजय करोसिया या दोघांना अटक केली.
वैभव याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने हे मेफेड्रोन हैदर नूर शेख याच्याकडून आणल्याचे सांगितले. पोलिसांनी त्वरेने हालचाल करत हैदर शेख याला विश्रांतवाडी परिसरातून ताब्यात घेतले.त्याच्याकडेही सुमारे १ कोटी रुपये किमतीचे क्रिस्टल स्वरुपातील ५०० ग्रॅम मेफेड्रोन पोलिसांना आढळून आले. या झडतीमध्ये त्याच्याकडे एक चावी पोलिसांना सापडली ती कशाची आहे याची चौकशी करता त्याने ती विश्रांतवाडी परिसरातील पत्र्याच्या गोडाऊनची असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्या गोडावूनची झडती घेतली असता त्यामध्ये सुमारे दीडकोटी रुपयांचे ७५० ग्रॅम मेफेड्रोन आढळून आले.त्याठिकणी २०० ते ३०० पोती पोलिसांना आढळली असून त्यातील काही पोत्यात मीठ असल्याचे पोलिसांना दिसून आले आहे. सर्व पोत्यांची तपासणी पोलीस सध्या करत आहेत.
हे मेफेड्रोन कोठून आणले याची चौकशी पोलिसांनी हैदर शेख याच्याकडे केली असता त्याने ते एका परदेशी नागरिकाने विकण्यासाठी दिल्याची कबुली दिली. पोलीस आता या परदेशी नागरिकाचा शोध करत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त प्रवीण पवार, अपरआयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे सहायक आयुक्त गुन्हे १ सुनिल तांबे, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, अजय वाघमारे, राजेंद्र लांडगे, अनितस हिवरकर, विनायक गायकवाड,सहायक निरीक्षक बाबर, गायकवाड, उपनिरीक्षक रमेश तापकीर, शेळके, गोरे, कोळेकर, मगदुम, देव, नाईक, जाधव शिंदे, मोकाशी, अंमलदार विठ्ठल सांळुखे, अभिनव लडकत, दता सोनावणे, निलेश साबळे, राहुल मखरे, अनिकेत बाबर, शशीकांत दरेकर, शुभम देसाई, शंकर कुंभार, अय्याज दड्डीकर, सुजित वाडेकर, संतोष देशपांडे, निखिल जाधव यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: