कर थकविणार्‍यांची यादी महापालिका वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणार!

 


जप्त केलेल्या २४ मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने थकित कर वसुलीसाठी  निकराचे प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. आता १ लाखापेक्षा जास्त कर थकित असणार्‍यांची नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहेत. याबरोबरच मालमत्ताजप्तीचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याचा पालिकेचा मानस आहे. तसे पत्रक महापालिकेच्या करसंकलन विभागाने प्रसृत केले आहे.थकबाकीदारांनी त्वरित थकीत आणि चालू कर भरून आपली कुप्रसिद्धी टाळावी. महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

जप्त केलेल्या मालमत्तांपैकी 24 मालमत्तांचे मुल्यांकन करून लिलाव समितीसमोर नुकताच प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यावर आठवड्याभरात निर्णय होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 6 लाख 15 हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून कर वसुलीसाठी महापालिकेचे 17 झोन आहेत. आतापर्यंत तब्बल 773 कोटी रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. मात्र, 1 हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख आणि त्यांची टीम झपाटून कामाला लागली आहे. 2023-24 हे आर्थिक वर्ष संपण्यास अवघे 38 दिवस बाकी आहेत. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी अतिशय सुक्ष्म पध्दतीने नियोजन करण्यात आले आहे.

 कर वसुलीसाठी कर संकलन विभागाने आत्तापर्यंत जप्ती मोहीम, नळ कनेक्‍शन बंद करणे या सारख्या कठोर कारवाया सुरू असतानाच आता प्रत्येक झोनमधील बड्या थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करताना काढण्यात येणारे व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केले जाणार आहेत.

 त्याचबरोबर सद्य स्थितीत चालू कर आणि थकीत कर भरण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागांमध्ये रिक्षावर स्पीकर लावून जनजागृती केली जात आहे. मात्र, जनजागृती करूनही आणि विशेष म्हणजे कर भरण्याची क्षमता असूनही कर भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांची नावे स्पीकरव्दारे जाहीर केली जाणार आहेत.


या आर्थिक वर्षात पालिकेने शंभर टक्के बिलांचे वाटप मे महिन्यात केलेले आहे. त्यानंतर 50 हजारवरील थकीत रकमा असणाऱ्या मालमत्ता धारकांना सहा महिन्यापूर्वीच जप्ती पूर्व नोटिसा बजावल्या आहेत. त्यानंतर टेलीकॉलिंगच्या माध्यमातून वारंवार फोन केले जात आहेत. अनेक वेळा एसएमएस पाठवून बिल भरण्याचे आवाहन केले जात आहे. पण त्यानंतरही थकबाकीदार प्रतिसाद देत नसल्यामुळे जप्ती, सिल करणे, नळ कनेक्शन कट करणे अशा अप्रिय कारवाया करणे भाग पडत आहे.

- नीलेश देशमुख, सहायक आयुक्त,पिंपरी चिंचवड महानगरपालिका


कर थकविणार्‍यांची यादी महापालिका वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणार! कर थकविणार्‍यांची यादी महापालिका वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणार! Reviewed by ANN news network on २/२३/२०२४ ०८:१४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".