हिंजवडीत दुचाकीवरून जाणार्या त्रिकुटाकडे आढळल्या बनावट नोटा; मोठ्या रॅकेटचा सहभाग असल्याची पोलिसांना शंका
पिंपरी : हिंजवडी माण रस्त्यावर १६ फेब्रुवारी रोजी दुपारी विनानंबरप्लेटच्या मोटारसायकलवरून जात असलेल्या तिघांना पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. त्यावेळी त्यांच्याकडे ५०० रुपयांच्या २४० बनावट नोटा आढळल्या. यानोटा त्यांनी घरीच छापल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, त्यांची छपाई इतकी अचूक आहे की, त्या छापण्यामागे मोठे रॅकेट असावे असा पोलिसांना संशय आहे. पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहेत.ताब्यात घेतलेल्या तिघांपैकी एक अल्पवयीन आहे.
या प्रकरणी श्रीकांत चव्हाण या पोलीसाने हिंजवडी पोलीसठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून अभिषेक राजेंद्र काकडे (वय २०), ओंकार रामकृष्ण टेकम (वय १८) दोघेही राहणार हिंजवडी यांना अटक करण्यात आली आहे. तर अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे.
१६ फेब्रुवारी रोजी दुपारी माण-हिंजवडी रस्त्यावर बोडकेवाडी फाटा येथे हिंजवडी पोलिसांचे पथक गस्त घालत असताना त्यांना एका विनानंबरप्लेटच्या मोटारसायकलवरून तिघे जात असताना दिसले. त्यांना पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते न थांबता पळून जाऊ लागले. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे ५०० रुपयांच्या २४० बनावट नोटा आढळल्या. पोलिसांनी या नोटा कोठून आणल्या याची चौकशी केली असता त्याणी घरातच छापल्याची कबुली दिली. मात्र, या नोटा हुबेहुब अस्सल नोटांसारख्या दिसत असल्याने पोलीस ते देत असलेल्या कबुलीबद्दल साशंक आहेत. या नोटा कोणत्यातरी मोठ्या रॅकेटने त्यांना पुरविल्या असाव्यात असा पोलिसांना संशय आहे. पोलीस ही शक्यता तपासून पाहत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: