गांधीजी आणि वारकरी संप्रदाय यांचा एकमेकांवर प्रभाव - ह. भ. प. ज्ञानेश्वर बंडगर
--------------
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि आळंदी नगरपरिषदेतर्फे आयोजन
पुणे: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी च्या वतीने 'राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आळंदी येथे घाटावरील रक्षा विसर्जन स्तंभ येथे १२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता हा कार्यक्रम झाला. यावर्षी ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. "गांधीजी आणि वारकरी संप्रदायाचा एकमेकांवर प्रभाव होता आणि आहे. संत तुकारामांच्या ओव्यांचे गांधीजींनी भाषांतर केले होते. तुकारामांचे विचार त्यांना प्रेरणादायी वाटत. देहू, आळंदी आणि पंढरपूर येथील मंदीरांमध्ये दलितांना प्रवेश मिळण्यासाठी गांधीजींच्या अनुयायांनी नेतृत्व केले, " असे बंडगर महाराजांनी विविध उदाहरणे देवून उलगडून दाखवले.
या कार्यक्रमाला आळंदी नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी व युवक क्रांती दलाचे कार्यकर्ते, वारकरी बांधव, ग्रामस्थ, विद्यार्थी, युवक - युवती आणि राष्ट्रपित्याचा आदर करणारे नागरिक आवर्जून उपस्थित होते.
सुत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त सचिव संदिप बर्वे यांनी केले. विश्वस्त अन्वर राजन यांनी अध्यक्षीय भाषण केले आणि बंडगर महाराजांचा सत्कार केला. कैलास केंद्रे (मुख्याधिकारी, आळंदी नगर पालिका) यांचे प्रतिनिधी श्री. गिरमे , आदित्य घुंडरे, देवराम घुंडरे- पाटील (अध्यक्ष, कस्तुरबा आदिवासी ज्ञानसेवा मंडळ), अर्जुन मेदनकर, गणपतराव कुर्हाडे -पाटील (अध्यक्ष, स्थानिक व्यवस्थापन समिती, आळंदी) , महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त डॉ. मच्छींद्र गोर्डे, भारतीय समाज विकास व संशोधन संस्थेचे विश्वस्त डॉ. प्रवीण सप्तर्षी, आळंदी कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदकुमार वडगावकर, इंद्रायणी फाऊंडेशनचे पदाधिकारी नितीन चव्हाण तसेच विविध वारकरी संस्थांचे विद्यार्थी ,महिला, टाळकरी उपस्थित होत्या.
राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण '
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर महात्माजींच्या इच्छेनुसार त्यांच्या अस्थी रक्षेचे भारतातील प्रमुख नद्यांप्रमाणे इंद्रायणीमध्येही विसर्जन झाले. एका कलशातील अस्थी रक्षेचे विसर्जन आळंदी येथील इंद्रायणी नदीमधे दि. १२ फेब्रुवारी १९४८ रोजी करण्यात आले. त्यांची स्मृती म्हणून इंद्रायणी काठी रक्षा विसर्जन स्तंभ उभारण्यात आला. दरवर्षी १२ फेब्रुवारी रोजी आळंदी येथे गांधीजींना अभिवादन करण्यात येते. ७६ वर्ष ही परंपरा सुरु आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: