अलिबाग : उरण पंचायतसमितीच्या बांधकाम विभागात काम करणारी एक महिला सहायक अभियंता आणि अलिबाग जिल्हा परिषद बांधकाम विभागात काम करणारा एक पुरुष सहाय्यक अभियंता लाचखोरीप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकले आहेत.
रेश्मा ओंकार नाईक, वय ३१, सहायक अभियंता, बांधकाम विभाग, पंचायत समिती उरण, जि. रायगड आणि सतिश वसंत कांबळे, वय ५१ वर्षे,सहायक अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, अलिबाग, जि. रायगड अशी या दोघांची नावे आहेत. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजून पंचावन्न मिनिटांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या नवी मुंबई येथील कार्यालयातील अधिकार्यांनी ही कारवाई केली.
रेश्मा नाईक यांनी एका व्यक्तीकडे त्याच्या गावातील विकासकामाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यासाठी ३० हजार रुपये लाच मागितली होती. वाटाघाटीनंतर त्यांनी २५ हजार रुपये घेण्याचे मान्य केले. या प्रकरणी त्याव्यक्तीने नवी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कार्यालयात तक्रार नोंदविली.अधिकार्यांनी तक्रारीची पडताळणी केली. त्यात तत्थ्य असल्याचे आढळल्याने २१ फेब्रुवारी रोजी सापळा लावला.त्यावेळी रेश्मा नाईक यांनी लाचेची रक्कम अलिबाग येथे सहायक अभियंता सतीश कांबळे यांच्याकडे देण्यास सांगितली. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजून ५५ मिनिटांनी ही रक्कम स्वीकारताना कांबळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने 'रंगेहाथ' पकडले. त्यानंतर रेश्मा नाईक यांनाही ताब्यात घेतले. याबाबत अलिबाग पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: