विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केले; सासू, जाऊ व नणंदेला १० वर्षे सक्तमजुरी

 


जिल्हा न्यायाधीश-१ व अति. सत्र न्यायाधीश, चिपळूण डॉ. अनिता एस. नेवसे यांनी ठोठावली शिक्षा

रत्नागिरी : विवाहितेची छळवणूक करणे, तिला शिवीगाळ करणे व तिला आत्महत्या करणेस प्रवृत्त करणे या गुन्हयासाठी चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश,  डॉ. अनिता एस. नेवसे  यांनी जिल्हा न्यायालयात आज मृत विवाहितेच्या सासू, जाऊ व नणंदेला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

 मृत महिलेची सासू हिरा मधुकर नाटेकर, जाऊ प्रतिभा नितीन नाटेकर व नणंद पुष्पा रत्नाकर जांभारकर अशी शिक्षा झालेल्या महिलांची नावे आहेत. या तीन्ही आरोपींना भा.द.वि. कलम ४९८-अ, ३०६, ५०४ सह ३४ हया गुन्हयांखाली सरकार पक्षाचा पुरावा ग्राहय धरून प्रत्येकी १० वर्ष सक्त मजूरीची शिक्षा व प्रत्येकी ८ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास कारावासाची शिक्षा ठोठावली.

     गुन्हयाची सविस्तर हकिकत अशी की, सदरहू गुन्हा मौजे असगोली खारवीवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी येथे दिनांक १४ सप्टेंबर २०१७ रोजी १२ वाजणेचे सुमारास घडला असून यातील फिर्यादी आरती मंगेश नाटेकर (मयत), आरोपी नं १ हिची सून होती. फिर्यादीचे लग्न होवून सुमारे ११ वर्षांचा कालावधी झालेला होता व तिला निल नावाचा दहा वर्षाचा मुलगा आहे. फिर्यादीचा नवरा मंगेश मधूकर नाटेकर हा मुंबई येथे मासेमारीचा व्यवसाय करीत होता. तिन्ही महिला आरोपींनी संगनमताने फिर्यादी हिने तिच्या सामाईक घरात सुखाने व आनदाने संसार करू नये व निघून जावे या उद्देशाने तिचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच तिला वेळोवेळी शिवीगाळ व अपमानित करून आत्महत्या करणेस भाग पाडले त्यामुळे दिनांक १४ सप्टेंबर २०१७  रोजी सून आरती जमिनीवरून पाय घसरून पडल्याने आरोपीला तिचा धक्का लागलेचे कारणावरून सासू हिरा नाटेकर हिने पुन्हा सूनेची शिवीगाळ करून छळवणूक केली.

       त्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळून आरती मंगेश नाटेकर हिने रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून आत्महत्येचा प्रयत्न केला. सदर घटनेत सून आरती ९५ टक्के भाजली. तिने तिचा मृत्यूपूर्व जबाब सरकारी दवाखान्यामध्ये दिला त्यामध्ये तिन्ही आरोपीविरूध्द तिने तक्रार दिली. त्यावरून प्रथम ४९८ (अ), व ५०४ अन्वये गुन्हा दाखल झाला. आरती रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल येथे मयत झाली. त्यामुळे कलम ३०६ हे वाढीव कलम लावून सदरचा खटला चिपळूण जिल्हा न्यायालयामध्ये चालला. सरकार पक्षातर्फे अॅड. श्री. प्रफ़ुल्ल साळवी यांनी एकूण ९ साक्षीदार तपासले व खटल्यातील मृत्यूपूर्व जबाब आत्महत्येस प्रवृत्त करणे व छळ या बाबी शाबित करण्यासाठी विविध न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले. 

        सर्व साक्षीपुरावा व सरकारी पक्षाचा युक्तिवाद तसेच मयताचा नवरा यांनी सत्याच्या बाजूने आपली आई, बहिण व भावजय यांचेविरूध्द दिलेली साक्ष ग्राहय मानून मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी आरोपींना दोषी ठरवून भा.द.वि कलम ३०६ च्या गुन्हयासाठी १० वर्षे सक्तमजूरी व ५ हजार रूपये दंड, कलम ४९८ (अ) गुन्हयासाठी ३ वर्षे सक्तमजूरी व प्रत्येकी २ हजार रुपये दंड, ५०४ गुन्हयासाठी २ वर्षे साधा कारावास व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा तिन्ही महिला आरोपींना आज जिल्हा न्यायालयात सुनावली.

      प्रस्तुत केसमधील सरकारी वकील म्हणून अॅड. प्रफ़ुल्ल रामचंद्र साळवी यांनी काम पाहिले. तसेच सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक. दिलीप जाधव यांनी केला व हेड कॉन्स्टेबल  प्रदीप भंडारी यांनी सरकार पक्षास मदत केली. महिलेनेच, महिलेविरूध्द केलेल्या गुन्हयामध्ये सुध्दा न्यायालयासमोर सबळ पुरावा आल्यास शिक्षा दिली जाते. याबाबत अभिप्राय सरकारी वकिल यांनी व्यक्त केला.

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केले; सासू, जाऊ व नणंदेला १० वर्षे सक्तमजुरी विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केले;  सासू, जाऊ व नणंदेला १० वर्षे सक्तमजुरी Reviewed by ANN news network on १/२५/२०२४ १०:३०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".