राजापूर तहसीलदार शीतल जाधव ग्रामस्थांशी चर्चा करताना
रत्नागिरी : राजापूर शहरालगतच्या धोपेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील पन्हळे तर्फ राजापूर गावामध्ये सुरू असलेला अनधिकृत मदरसा बंद करावा, असा ठराव ग्रामसभेमध्ये पारीत झालेला असतानाही आणि याबाबत ग्रामपंचायत, महसुल आणि पोलीस प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी धोपेश्वर ग्रामपंचायतीसमोर उपोषण छेडले. त्यामुळे जागे झालेल्या प्रशासनाने ग्रामस्थांची समजूत काढताना फेब्रुवारी महिना अखेरपर्यंत याबाबत निर्णय देण्याची ग्वाही दिली आहे.
धोपेश्वर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये पन्हळे तर्फ राजापूर येथे एका शेतघरामध्ये ग्रामपंचायत अथवा शासनाची कोणतीही परवानगी न घेता मदरसा सुरू करण्यात आला आहे. या मदरशामध्ये परराज्यातील मुले राहत असून त्यांचे गावात स्वैरवर्तन सुरू झाल्याने ग्रामस्थांनी याबाबत ग्रामपंचायतीकडे तकार केली होती. त्यानुसार दि.7 नोव्हेंबर 2023 रोजीच्या ग्रामसभेमध्ये या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी या मदरशाला विरोध दर्शवित विनापरवाना सुरू असलेला मदरसा बंद करण्याचा ठराव बहुमताने मंजूर केला होता.
आमदार राजन साळवी चर्चा करताना
मदरशाला ग्रामस्थांचा विरोध असतानाही ग्रामपंचायतीने शेतघर मालकाला 15 दिवसांमध्ये कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत संबंधितांनी कोणतीही कागदपत्रे सादर केलेली नसताना अद्यापही ग्रामपंचायतीने मदरशावर कोणतीही कारवाई केलेली नाही. राजापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गावामध्ये परराज्यातील तरूण मुले वास्तव्याला आहेत. ही मुले नेमकी परराज्यातील आहेत की अन्य कुठली आहेत, याबाबतही ग्रामस्थ अनभिज्ञ आहेत. शिवाय मदरशामध्ये राहणाऱया मुलांचा गावामध्ये स्वैरवावर असल्याने गावामध्येही भितीचे वातावरण असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
अनधिकृत मदरसा बंद करावा या मागणी करीता ग्रामस्थांचा सातत्याने पाठपुरावा सुरू असताना प्रशासन कोणतीच कार्यवाही करत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी धोपेश्वर ग्रामपंचायती समोर उपोषण छेडले. यावेळी पन्हळे, धोपेश्वर, बारसू गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाय या आंदोलनाला राजापूरातील सकल हिंदू समाजाने पाठींबा दर्शवत मोठ्या संख्येने नागरिकांनी उपोषणस्थळी हजेरी लावली होती. यावेळी उपस्थितांनी ग्रामविकास अधिकारी यांना घेराव घालत धारेवर धरत प्रश्नांचा भडीमार केला. त्यामुळे भेदरलेल्या ग्रामविकास अधिकाऱयाची प्रकृतीही खालावली. अखेर काही जणांनी पुढाकार घेत त्यांना त्या गराड्यातून सुरक्षित बाहेर काढले.
दरम्यान राजापूर तहसीलदार शितल जाधव यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत चर्चा केली. फेबुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत या विषयावर तोडगा काढण्याचे आश्वासन तहसीलदार यांनी दिले आहे. तसेच आमदार राजन साळवी यांनी देखील उपोषणस्थळी भेट देत चर्चा केली.
Reviewed by ANN news network
on
१/२७/२०२४ ०८:२७:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: