१६ लाख ६८ हजार ४४ रुपयांची वसुली; १७ प्रकरणे निकाली
रत्नागिरी : तालुका विधी सेवा समिती व वकील संघ, चिपळूण याच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार, मोबाईल लोकअदालत यशस्वी करण्यासाठी कापसाळ येथे मोबाईल लोकअदालतीच्या माहितीविषयक व कायदेविषयक जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरासाठी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश श्री. जामखेडकर, तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे व ज्येष्ठ विधीज्ञ अॕड एन.जी.लाड उपस्थित होते.
डॉ. नेवसे यांनी यावेळी प्रास्ताविकपर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या “न्याय आपल्या दारी " ही संकल्पना अंमलात आणण्याकरिता उच्च न्यायालयाकडून पुरविण्यात आलेली मोबाईल लोकअदालत व्हॅन चिपळूण तालुक्यात गावोगावी फिरून अनेक प्रकरणांमध्ये तडजोडी करणार आहेत. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी आपले प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे निपटारा करण्यासाठी या लोकअदालतीमध्ये ठेवावीत, असे आवाहन केले. तसेच लोकअदालत मध्यस्थी प्रक्रिया व मोबाईल लोकअदालत याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
या मोबाईल लोकअदालत कामकाज करण्यासाठी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश श्री.जामखेडकर यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना लोकअदालतीचे महत्त्व सोप्या भाषेत समजावून सांगितले तसेच विविध उदाहरणाद्वारे गुंतागुंतींच्या प्रलंबित प्रकरणांमध्ये कशी तडजोड होवू शकते याबाबत मार्गदर्शन केले. वादपूर्व प्रकरणे कशा प्रकारे हाताळावी, दिवाणी व फौजदारी तडजोड योग्य प्रकरणांत मध्यस्थांची कोणती भूमिका असावी व विविध सरकारी व निम सरकारी कार्यालयांची जबाबदारी कोणती याबाबत माहिती दिली. तसेच ज्येष्ठ विधीज्ञ श्री. लाड यांनी मध्यस्थी प्रक्रिया म्हणजे काय व मोबाईल लोकअदालतीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे दावे व खटले तडजोड होवू शकतात याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
जिल्हा न्यायालय चिपळूण मोबाईल लोकअदालतीच्या प्रत्यक्ष कामकाजास सुरूवात झाली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला विधी महाविद्यालय खेडच्या विद्यार्थ्यांनी पथनाटय सादर करून, मोबाईल लोकअदालतीचे महत्त्व उपस्थित पक्षकारांना समजावून सांगितले. ही मोबाईल व्हॅन म्हणजे चालते फिरते न्यायालयच व पक्षकारांना न्याय आपल्या दारी म्हणजे नेमके काय याबाबत उदाहरणाद्वारे माहिती दिली. या लोकअदालतीमध्ये दिवाणी २५ व फौजदारी ३२ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. एकूण ५७ प्रकरणांपैकी १७ प्रकरणे निकाली करण्यात आली. सदर प्रकरणांमध्ये एकूण १६ लाख ६८ हजार ४४ रुपये रूपयांची वसुली करण्यात आलेली आहे. या लोकअदालतीस पक्षकारांचा व वकिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या लोकअदालतीचे कामकाज यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पी.आर. कुलकणी, दिवाणी न्यायाधीश, चिपळूण एम.आर.काळे, सह दिवाणी न्यायाधीश, चिपळूण व न्यायालयीन कर्मचारी यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. कासार यानी केले.
Reviewed by ANN news network
on
१/०९/२०२४ ०९:२६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: