तमीळनाडूतून पिंपरी चिंचवडमध्ये येऊन मोबाईल, लॅपटॉप चोरणारे तिघे जेरबंद!; वाकड पोलिसांची कामगिरी (VIDEO)
२३ गुन्हे उघड!!
पिंपरी : मोबाईल आणि लॅपटॉप चोरण्यासाठी तमीळनाडूतून आलेल्या तिघांना वाकड पोलीसठाण्याच्या पथकाने जेरबंद केले असून त्यांच्याकडून १४ लाख ३० हजार रुपये किमतीचे ६० मोबाईल फोन्स आणि १४ लॅपटॉप हस्तगत केले आहेत. हे चोर पिंपरी चिंचवडमध्ये भाड्याने खोली घेऊन रहात होते. एखाद्या शहरात जायचे. तिथे खोली भाड्याने घ्यायची आणि शहरात फ़िरून घराच्या उघड्या दिसणा-या दरवाजातून आत शिरून मोबाईल आणि लॅपटॉप घेऊन पसार व्हायचे अशी या चोरांची चोरी करण्याची पद्धत होती. त्यांच्या अटकेमुळे २३ गुन्हे उघडकीस आले आहेत.
गुनासेकर संकर वय २१ वर्षे, तामीलारसन आदेश वय २१ वर्षे,सौंदराजन गोविंदन वय २१ वर्षे सर्व सध्या रा. चंद्रशेखर माणिकचंद जैन यांचे खोलीत, जैनशांती अदिनाथनगर, सुखवानीबाग, भोसरी पुणे मूळ राहणार उदयराज पालयम, पोस्ट थोट्टलाम, मादनूर तालुका अंबूर जिल्हा वेल्लोर राज्य तमीळनाडू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
शहरात उघड्या दरवाजातून घरात शिरून चोरी करण्याच्या प्रमाणात वाढ झाली असल्याने वाकड पोलिसांचे पथक तपास करत असताना चोरटे वाकड पोलीसठाण्याच्या हद्दीत गुन्हा करून काळेवाडी फाटा येथून रिक्षाने पिंपरीकडे जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी चोरट्यांच्या शोधासाठी ४ पथके तयार केली. ही पथके तपास करत असताना एका पथकाला काळेवाडी फाटा येथे सकाळच्या वेळेत आरोपी सौंदराजन गोविंदन सापडला. त्याच्याकडे ३ मोबाईल आणि २ लॅपटॉप सापडले. त्याची सखोल चौकशी केली असता अन्य दोन आरोपींची नावे निष्पन्न झाली. पोलिसांनी आरोपी भाड्याने रहात असलेल्या भोसरीतील ठिकाणी छापा घातला असता सौंदराजनचे दोन्ही साथीदार तेथून अगोदरच पसार झाल्याचे त्यांना दिसून आले. पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे त्यांचा शोध घेऊन ते कर्नाटकात पळून जाण्यासाठी एम. आर. ट्रॅव्हल्सच्या बसने प्रवास करत असताना त्या बसचा पाठलाग करून सातार्यानजिक त्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून ६० मोबाईल फोन्स आणि १४ लॅपटॉप हस्तगत करण्यात आले आहेत.
Reviewed by ANN news network
on
१२/२७/२०२३ १०:२९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: