तैलिक महासभेने केला बीडमधील जाळपोळीचा निषेध

 


पिंपरी : तैलिक महासभा या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बीडमध्ये करण्यात आलेल्या राजकीय नेत्यांच्या मालमत्तांच्या जाळपोळीचा निषेध केला आहे. या प्रकरणी तैलिक महासभेच्या कार्यकर्त्यांनी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस व अजित पवार यांना निवेदन दिले आहे. त्याची प्रत हवेलीच्या तहसीलदार अर्चना निकम यांना देण्यात आली आहे.

हे निवेदन महाराष्ट्र तैलिक महासभेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अनिल राऊत आणि सरचिटणीस प्रथमेश आंबेरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदारांना दिले. यावेळी खानदेश तेली समाज अध्यक्ष अनिल जयराम चौधरी, खानदेश तेली समाज महिला मंच अध्यक्षा शैला रमेश चौधरी, सुनंदा दिलीप चौधरी, भरत चौधरी, रमेश चौधरी आणि महासभेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, आज महाराष्ट्रात जो मराठा आंदोलकांनी आरक्षणासाठी धूडगूस घालून महाराष्ट्र जाळायला घेतला आहे, या बेछूट, बेहोश व बेधुंदपणे आगी व जाळपोळीचा जो नंगानाच चालवला आहे त्याची झळ आमच्या समाजाचे राष्ट्रीय नेते श्री जयदत्त क्षीरसागर व  युवा आघाडीचे अध्यक्ष श्री संदीपजी क्षीरसागर, बीड यांच्या निवासस्थानासह पाच- सहा गाड्या तसेच कार्यालयाला आगी लावून भस्मसात केले व घरामधील सर्वांना जिवंत जाळण्याचे षडयंत्र केले आहे.याशिवाय आमदार श्री प्रकाशजी सोळंकेसाहेब,श्री प्रशांत बंबसाहेब,श्री कुंडलिक खाडे यांचे सह अनेक अल्पसंख्यांक व मागासवर्गाच्या समाजाला देखील  मराठा समाजाच्या आंदोलकांनी? वेठीस धरून जाळपोळ केलेले हे कृत्य अत्यंत घृणास्पद व निंदनीय आहे..

खरं तर मराठा आरक्षणाला सर्व ओबीसी समाज,अल्पसंख्यांक व मागासवर्गाने पाठिंबा दर्शवला असून ज्या मराठा समाजाच्या नेत्यांनी उदा. नारायण राणे व रामदास कदम ज्यांनी आरक्षणाला विरोध केला   त्यांच्या विरोधात आंदोलन न करता आमच्या विरोधात त्यांनी आंदोलन करणं हे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशीच नाही कां.?

आपणास या निवेदनाद्वारे विनंती करत आहोत की ज्या कुणी आंदोलकांनी ओबीसी समाजबांधवांची व अल्पसंख्यांकांच्या घरे, गाड्या व कार्यालये जाळली त्यांना ताबडतोब शोधून, अटक करून त्यांचेवर कलम ३०२ अन्वये कठोर कारवाई करावी व त्यांच्याकडूनच या बांधवांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी आपणांकडे करीत आहोत.

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ही तेली(ओबीसी) समाजाची राज्यस्तरीय संघटना असून आज पावतो आम्ही मराठा आरक्षणाबाबत सदैव समन्वयाच्या भूमिकेमध्ये महाराष्ट्र शासनाशी  बोलणी करीत आलेलो आहोत. दिनांक २९ सप्टेंबर च्या महाराष्ट्र शासनाने बोलावलेल्या सभेमध्ये देखील याबाबत आम्ही आमची भूमिका मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी आमचे दुमत नाही परंतु ते ओबीसीच्या तुटपुंज्या असलेल्या आरक्षणांमधून देऊ नये.त्यांना वेगळे आरक्षण द्यावे तसेच त्यांना सरसकट आरक्षणही देऊ नये असे आम्ही स्पष्टपणे मांडली होती व त्यास शासनाने मंजुरीही दिली होती.सामंजस्याची भूमिका घेऊनही जर तेली समाज, अल्पसंख्यांक, मागासवर्गीय व ओबीसी समाज हा मराठा आरक्षणासाठी मदत करत असतांना देखील जर मराठा समाजाच्या आंदोलकांनी  विरोधकांना विरोध न करता आमच्या मदत करणार्‍या समाजांची घरे जाळत असतील तर हे म्हणजे "पाटलांना दिली ओसरी व पाटील हातपाय पसरी" असेच झाले नां..!

 आंदोलकांच्या ह्या चाललेल्या सगळ्या झोटिंगशाहीला व दडपशाहीला आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत.आंदोलकांच्या या आक्रसताळेपणामुळे आमचा समाजच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक,मागासवर्गीय व ओबीसींना त्यांनी वेठीस धरले आहे. गांवकूस, खेड्यातील वरील बांधव आजमितीस बिल्कूल सुरक्षित नाही.

सबब, आपण अल्पसंख्यांक,मागास समाजाला व ओबीसींना योग्य ती सुरक्षा पुरवण्यासाठी महाराष्ट्र शासनाला आदेश द्यावेत तसेच हे जर असेच चालू राहिले व सरकार तर्फे जर या गोष्टींना आळा घातला गेला नाही तर कृपया आपण महाराष्ट्रामध्ये "राष्ट्रपती राजवट" लागू करावी अन्यथा आम्हाला आमच्या आरक्षणासाठी व स्वसंरक्षणासाठी जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरावे लागेल व त्यास हे महाराष्ट्र शासनच जबाबदार असेल याची कृपया शासनाला नोंद घेण्यास सांगावे व लवकरात लवकर आमच्या वरील मागण्या मान्य कराव्यात.
तैलिक महासभेने केला बीडमधील जाळपोळीचा निषेध  तैलिक महासभेने केला बीडमधील जाळपोळीचा निषेध Reviewed by ANN news network on ११/०२/२०२३ ०८:५७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".