खेड : खेड शहर पोलीसस्थानकाच्या मागे असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या मागील बाजूस असलेल्या कच-याच्या ढिगात काही राष्ट्रध्वज फ़ेकून दिल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. आज दिनांक ११ रोजी माध्यम प्रतिनिधींच्या कानावर हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलीस निरीक्षकांना ही बाब सांगितली. मात्र, त्यांनी आमचा या प्रकाराशी काहीही संबंध नाही; हा परिसर आमचा नाही असे सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला असे समजते.
या बाबत असे कळते की, खेड पोलीस्थानकाच्या मागील बाजूस एक सार्वजनिक स्वच्छतागृह असून त्याचा वापर प्रामुख्याने पोलीसठाण्यात येणारे नागरिक, पोलीस अधिकारी, कर्मचारी नियमीतपणे करतात. सोमवारी एक नागरिक या स्वच्छतागृहात गेला असता त्याला खिडकीतून हा प्रकार दिसला. त्यानंतर हा प्रकार षट्कर्णी झाला. आज. हे वृत्त कळताच माध्यम प्रतिनिधींनी तेथे जाऊन खातरजमा केली असता ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर या स्वच्छतागृहात पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा नियमीत राबता असल्याने माध्यम प्रतिनिधींनी ही बाब पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या कानी घातला. मात्र, त्यांनी वस्तुस्थितीची शहानिशा न करताच, ते प्लास्टिकचे झेंडे आहेत असा सुरुवातीला दावा केला. मात्र तुम्ही झेंडे पाहिलेत का? असे विचारल्या नंतर पोलीस निरीक्षक भोयर यांनी माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत घटनास्थळी पाहणी केली. प्रकारचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर भोयर यांनी कर्मचाऱ्यांना सांगून झेंडे ताब्यात घेतले. याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी भोयर यांनी विचारले असता हा परिसर आमचा नाही हे इथे कोणी टाकले माहिती नाही असे सांगत काखा वर करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान हा प्रकार गंभीर असल्याने काहींनी तालुक्याच्या प्रशासनाचे प्रमुख असलेल्या तहसीलदारांच्या कानावर घालण्यासाठी तहसीलदार कार्यालयाला भेट दिली दिली असता त्यांची तहसीलदारांशी भेट होऊ शकली नाही. मात्र; नायब तहसीलदारांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. व या प्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. हे राष्ट्रध्वज तेथे उकीरड्यावर कोणी आणून टाकले?. आणि एव्हढे दिवस पोलीसठाण्यातील एकाही व्यक्तीच्या लक्षात ही बाब कशी आली नाही? तसेच निरीक्षक भोयर या प्रकरणाची दखल घेण्याचे टाळण्याचा सातत्याने का प्रयत्न करत होते? वस्तुस्थितीचा पंचनामा न करताच हे ध्वज उचलून ध्वजसंहिता आणि भारतीय दंडविधानानुसार गंभीर गुन्हा असलेल्या या घटनेचा पुरावाच नष्ट करण्याची घाई का केली? असे प्रश्न या मुळे निर्माण झाले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: