कार्यानुभव देणारी शिक्षण प्रणाली आवश्यक: प्रा. अरविंद गुप्ता

 


 'कहाणी पाबळच्या विज्ञान आश्रमाची' पुस्तकाचे अरविंद गुप्ता यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे: 'कामावर आधारित शिक्षण प्रणाली कौशल्य शिकवते, आत्मसन्मान,आत्मविश्र्वास वाढवते, त्यामुळे या शिक्षण प्रणालीला प्रोत्साहन मिळाले पाहिजे', असे प्रतिपादन ज्येष्ठ संशोधक प्रा. अरविंद गुप्ता यांनी केले.

'उद्दिष्ट चांगले असेल तर प्रतिकूल परिस्थितीत काम करून चांगले शिक्षण घेता येते , भोवतालचे प्रश्न सोडविता येतात, हे विज्ञान आश्रम च्या उदाहरणावरून दिसून येते, असेही प्रा. गुप्ता यांनी सांगीतले. विज्ञान आश्रम ची यश कथा पुस्तक रुपात आले ही महत्वाची गोष्ट असून हे पुस्तक हिंदीत देखिल यावे, यासाठी मी प्रयत्न करेन, असे ते म्हणाले.

ग्रामीण विकासासाठी शिक्षणाच्या माध्यमातून विज्ञान, तंत्रज्ञानाचा ध्यास घेतलेल्या पाबळ, जि पुणे येथील विज्ञानाश्रम चा प्रवास पुस्तकरूपात आला आहे.हा प्रवास उलगडून दाखविणाऱ्या        'कहाणी पाबळच्या विज्ञान आश्रमाची'  या पुस्तकाचे प्रकाशन दि.८ ऑक्टोबर रोजी अरविंद गुप्ता यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

विज्ञानाश्रमाचे संचालक डॉ. योगेश कुलकर्णी लिखित हे पुस्तक समकालीन प्रकाशन तर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन  कार्यक्रमाला  ज्येष्ठ संशोधक डॉ .अरविंद गुप्ता हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  हा कार्यक्रम जे.पी नाईक सेंटर फॉर एज्युकेशन ,    एकलव्य पॉलिटेक्निक च्या मागे कोथरूड डेपो, पुणे येथे सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत झाला.

 विज्ञानाश्रम स्थापनेला ४० वर्ष झाल्याने त्याबाबतची माहिती, प्रेरणा आणि योगदान सर्वांपर्यंत जावे, या हेतूने हे पुस्तक लिहिल्याची माहिती डॉ.योगेश कुलकर्णी यांनी दिली.

यावेळी विज्ञान शिक्षणावर परिसंवाद आयोजित करण्यात आले. त्यात अरविंद गुप्ता, विजय कुमार, डॉ योगेश कुलकर्णी, वंदना अत्रे, शोभना भिडे, गौरी कानेटकर, अनिल गाडे, कल्याणी चावली आदि सहभागी झाले.

डॉ. योगेश कुलकर्णी म्हणाले,', ग्रामीण भागाच्या गरजा जशा बदलत आहेत, विज्ञान आश्रम चा अभ्यासक्रम तसतसा बदलत गेल्या आहेत.आता पाण्याच्या पुनर्वापराच्या तंत्रज्ञानावर भर दिला जात आहे.तंत्रज्ञानाचा फायदा सर्वांना मिळावा असाच आमचा प्रयत्न आहे'.

अशोक कलबाग , रणजित कलबाग,गिरीश सोहोनी,     सुभाष देशपांडे, डॉ. मिलिंद नाईक,दिलीप टिकले ( कनेक्ट डॉट ), हेमंत गाडगीळ, डॉ.विवेक सावंत,  प्रा. रमेश पानसे, रेणू दांडेकर उपस्थित होते. भक्ती तलवेलकर यांनी सूत्र संचालन केले. गणेश पिंगळे यांनी आभार मानले.

विज्ञानाश्रमाविषयी :

डॉ श्रीनाथ कलबाग यांनी १९८३ साली भारतीय शिक्षण संस्थेचे केंद्र म्हणून पाबळ येथे विज्ञान आश्रमाची स्थापना केली. ते हिंदुस्थान लिव्हर या प्रसिद्ध कंपनीच्या ‘इंजिनिअरिंग सायन्स’ विभागाचे प्रमुख होते. शिक्षण हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांनी १९८३ च्या सुमारास विज्ञान आश्रम सुरू केला. अनेक मुले, त्यांनी शाळा सोडली असली तरी, जीवनात यशस्वी होतात. ती काम करत करतच शिकतात. याचाच अर्थ काम करत करत शिकणे ही शिकण्याची नैसर्गिक पद्धत आहे. समाजातील जास्तीत जास्त मुले अशा प्रकारे शिकत असतील तर शिकण्याची हीच मुख्य पद्धत हवी, या विचारातून डॉक्टरांनी विज्ञान आश्रमाची स्थापना केली. त्यांनी ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांच्याशी चर्चा केली. भारतातील एक प्रातिनिधिक खेडे म्हणून पाबळ हे खेडे निवडले आणि येथे हा आश्रम सुरू झाला. पुढे इथेच खऱ्या शिक्षणाचा इतिहास घडला. आश्रमाच्या शिक्षण पद्धतीमुळे, रूढार्थाने हुशार नसलेली अनेक मुले उद्योजक बनतात. सध्या  डॉ.योगेश कुलकर्णी  हे विज्ञान आश्रमचे कार्यकारी संचालक आहेत.

शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण विकास या संकल्पनेवर विज्ञान आश्रम काम करत आहे. ग्रामीण युवकांना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचे शिक्षण देऊन त्यांना त्यांचे उद्योग सुरू करून देणे हे विज्ञाना आश्रमाचे काम आहे. ग्रामीण भागातील गरजा लक्षात घेऊन त्यासाठी समुचित तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम विज्ञान  आश्रम  करतो. पाबळ येथे  डोम आकाराची घरे, विविध शेतकी अवजारे, शेती आणि पशुपालनातील आधुनिक तंत्रे खाद्य निर्मितीतील विविध व्यवसाय संधी इलेक्ट्रॉनिक्स फॅब्रिकेशन अशा विविध विषयांमध्ये विज्ञान आश्रम युवकांना प्रशिक्षण देतो.

विज्ञान आश्रमाच्या शैक्षणिक संकल्पनेचा प्रसार ग्रामीण भागापर्यंत होण्यासाठी माध्यमिक शाळांसाठी 'मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख' हा अभ्यासक्रम तयार केला आहे. इयत्ता इयत्ता आठवी ते दहावी मधील शाळांमध्ये हा कार्यकेंद्रि अभ्यासक्रम राबवला जातो. नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता सहावी ते आठवीसाठी व्यवसाय शिक्षणाची तोंड ओळख हा अभ्यासक्रम विज्ञान आश्रमाने तयार केला आहे. 

महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या इंटर्नशिप आणि फेलोशिप विज्ञान आश्रम तर्फे दिल्या जातात. त्यामध्ये समाजातील तांत्रिक प्रश्नांवर विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी दिली जाते. विद्यार्थ्यांच्या बरोबर काम करून अनेक समाज उपयोगी तंत्रज्ञान विज्ञान आश्रमाने विकसित केले आहे.

अंडी उबवणी यंत्र, सांडपाणी व्यवस्थापन यंत्रणा, हातसडीचा भात तयार करणारे मशीन, ओल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी कंपोस्टर आदी अनेक तंत्रज्ञाने विज्ञान आश्रमाने विकसित केली आहेत व त्यावर आधारित व्यवसाय सुरू करण्यास मदत केली आहे.

कार्यानुभव देणारी शिक्षण प्रणाली आवश्यक: प्रा. अरविंद गुप्ता कार्यानुभव देणारी शिक्षण प्रणाली आवश्यक: प्रा. अरविंद गुप्ता Reviewed by ANN news network on १०/०८/२०२३ ०८:११:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".