आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकीच्यादृष्टीने धावपट्टी वाढविण्यासाठी सर्वेक्षण करा : मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : पुणे विमानतळ येथील नवे टर्मिनल सुरू झाल्यानंतर देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूकीच्या गरजेनुसार आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकीच्यादृष्टीने धावपट्टीची लांबी वाढविण्यासाठी सर्व पैलूंचा अभ्यास करण्यात यावा, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
पुणे विमानतळ येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त राहुल महिवाल, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाचे पुणे विमानतळ व्यवस्थापक संतोष ढोके आदी उपस्थित होते.
मंत्री श्री.पाटील म्हणाले, नव्या टर्मिनलमुळे दहा पार्कींग बेज एरोब्रिज ने सुसज्जित उपलब्ध असून विमानफेऱ्यांची संख्या २१८ पर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे देशांतर्गत विमान वाहतूकीच्यादृष्टीने पुरेशी व्यवस्था निर्माण होणार आहे. यासोबत भविष्याच्यादृष्टीने आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक वाढविण्यासाठीही प्रयत्न करावे लागतील. त्यादृष्टीने आवश्यक अभ्यास करण्यात यावा. पुरंदर विमानतळाच्या कामाला गती देण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. नव्या टर्मिनलसाठी आवश्यक रस्त्याच्या कामालाही गती द्यावी, असे त्यांनी सांगितले.
श्री.ढोके यांनी सादरीकरणाद्वारे पुणे विमानतळ येथील विमान सेवेबाबत माहिती दिली. पुणे विमानतळ येथून दररोज सुमारे तीस हजार प्रवासी प्रवास करतात, त्यातील सुमारे ५४० आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत. २०२२-२३ मध्ये ५९ हजार ४५१ विमानफेऱ्यांद्वारे ८० लाख प्रवाशांनी येथील विमानसेवेचा लाभ घेतला तर यावर्षी सप्टेंबरपर्यंत ३१ हजार ५९१ विमानफेऱ्यांद्वारे पुणे विमानतळावरील प्रवासी संख्या ४७ लाखाहून अधिक आहे. नवे टर्मिनल सुरू झाल्यावर ही संख्या दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. नव्या टर्मिनलचे क्षेत्रफळ ५१ हजार ५९५ वर्ग फूट असून ते अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
Reviewed by ANN news network
on
१०/०५/२०२३ ०६:०८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: