पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कासारवाडी येथील जलतरण तलावार काल मंगळवारी क्लोरीन वायुची गळती झाल्याने प्रकृती गंभीर बनलेल्या १६ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. या प्रकरणी सकृतदर्शनी जलतरण तलावाचा ठेका घेतलेल्या कंपनीचा निश्काळजीपणा कारणीभूत असल्याचे दिसून आल्याने महापालिका प्रशासनाने कंपनीला कारणे दाखवा नोटीस दिली असून कंपनीविरुद्ध भोसरी पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त मिनिनाथ दंडवते यांनी दिली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलाव, कासारवाडी येथे दि.१०/१०/२०२३ रोजी स.८. ३० वाजता क्लोरिन गॅसच्या टाकीतून गॅस गळती झाली. ही बाब जलतरण तलावावरील व्यवस्थापक, जीवरक्षक यांच्या लक्षात येताच तलावामधील एकूण १६ नागरिकांना तात्काळ तातडीने बाहेर काढण्यात आले. यापैकी १२ नागरिक, ०४ जीवरक्षक, ०१ सुरक्षारक्षक यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने, महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालय, पिंपरी येथे दाखल करण्यात आले.
सदर जलतरण तलावातील पाणी शुद्धीकरण, परिसर स्वच्छता, साफसफाई देखभाल व यांत्रिक देखभाल दुरुस्तीचे काम मे. सुमित स्पोटर्स अँन्ड फिटनेस इक्विपमेंटस, चिंचवड यांना नेमून दिलेले आहे. सदर ठिकाणी प्रत्यक्ष पहाणी केली असता क्लोरिन गॅसची टाकी अत्यंत जुनी, गंजलेली, खराब अवस्थेत असल्याने याबाबत काम करणा-या एजन्सीने आवश्यक खबरदारी न घेता हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आले आहे. सदर एजन्सीला नोटीस दिलेली असून खुलासा घेऊन हलगर्जीपणाबाबत जबाबदार धरुन सक्त कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नागरीकांना इजा होईल, जीवीतास धोका होईल अशी परिस्थिती निर्माण करण्यास जबाबदार असल्याने मे.सुमित स्पोटर्स अॅन्ड फिटनेस इक्विपमेंटस, चिंचवड यांच्याविरुध्द भोसरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात येत आहे.
Reviewed by ANN news network
on
१०/११/२०२३ ११:१३:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: