पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली आहे. या त्रिकुटाकडून गॅस सिलेंडर, रीफिलर, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शरद काशिनाथ पाटील (वय 24, रा. रुपीनगर, तळवडे), सुशांत तानाजी घाडगे (वय 43, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), अर्जुन रामचंद्र नरळे (वय 40, रा. रुपीनगर, तळवडे. मूळ रा. सांगोला, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
ओटास्कीम निगडी आणि दत्तवाडी आकुर्डी भागात गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनला मिळाली. पोलिसांनी सूर्या गॅस सर्विस, गणेश कामगार नगर, दत्तवाडी आकुर्डी आणि क्रिष्णा गॅस सर्विस, आझाद चौक, ओटास्कीम निगडी या ठिकाणी सापळा लावला. आणि, गॅस रिफिलिंग करणाऱ्या या तिघांना ताब्यात घेतले.
सुशांत घाडगे हा सरस्वती गॅस एजन्सी, संभाजीनगर येथे सिलेंडर वाहतूक करणाऱ्या गाडीवर चालक म्हणून काम करत होता. ग्राहकांनी बुक केलेले सिलेंडर त्यांना न देता तो ते सूर्या गॅस सर्विस, दत्तवाडी, आकुर्डी येथील शरद पाटील याला विकत असे. शरद पाटील लहान टाक्यांमध्ये गॅस रिफील करून त्याची विक्री करीत असे. तसेच क्रिष्णा गॅस सर्विस ओटास्कीम निगडी येथे अर्जुन रामचंद्र नरळे हा देखील लहान टाक्यांमध्ये गॅस रिफील करून त्याची विक्री करीत असे. पोलिसांनी आरोपींकडून घरगुती गॅस सिलेंडर, लहान सिलेंडर, रीफिलर, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी अधिकारी, निरीक्षक जितेंद्र कदम, उपनिरीक्षक गणेश माने, अंमलदार दीपक खरात, जमीर तांबोळी, जयवंत राऊत, संदेश देशमुख, उद्धव खेडकर, आतिश कुकडे, सागर अवसरे, अजित सानप, शिवाजी मुंढे यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
१०/३१/२०२३ ०९:५९:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: