रत्नागिरी : पालकमंत्र्यांच्या मान्यतेने औषध खरेदीसाठी शासकीय रुग्णालयाला 5 कोटी : जिल्हाधिकारी

 



वरिष्ठ अधिकारी सिव्हीलला, तर प्रांताधिकारी उपजिल्हा रुग्णालयांना देणार भेटी

रत्नागिरी :  पालकमंत्री उदय सामंत यांच्या मान्यतेने शासकीय रुग्णालयात औषध खरेदीसाठी 5 कोटी रुपये मंजूर केले आहेत. असे सांगतानाच मुख्य कार्यकारी अधिकारी, परिविक्षाधीन आय ए एस, अपर जिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांनी उद्यापासून शासकीय रुग्णालयांना भेटी देवून पाहणी करावी. प्रांताधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांची पाहणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले.

 नांदेड येथील शासकीय रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कार्यान्वित आरोग्य यंत्रणांच्या सेवा सुविधांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे आज आढावा बैठक घेतली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, परिविक्षाधीन आय ए एस डॉ.जस्मीन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संघमित्रा फुले, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, संगमेश्वर प्रांताधिकारी विजय सूर्यवंशी उपस्थित होते.

  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. फुले यांनी प्रथम माहिती दिली. त्या म्हणाल्या, सध्या आवश्यक  औषधसाठा विशेषत: प्रतिजैविके आहेत. त्या व्यतिरिक्त लागणाऱ्या औषधांसाठी स्थानिक खरेदीचा अधिकार वैद्यकीय अधिक्षकांना दिला आहे. जिल्हा नियोजनमधून औषधे खरेदीसाठी 5 कोटी अनुदान मिळाले असून, 15 दिवसांत औषध खरेदी प्रक्रीया राबवित आहे. 

     जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले ,उद्यापासून प्रांताधिकाऱ्यांनी शासकीय रुग्णालयांना भेटी द्या. परिसर स्वच्छतेची पाहणी करा. साफसफाईमध्ये स्वच्छतागृहे स्वच्छ आहेत का पहा. रिक्त डॉक्टरांच्या मागणीसाठी पत्र द्यावे. शासनस्तरावर अपर मुख्य सचिवांशी पाठपुरावा करुन जागा भरली जाईल. कंत्राटी पध्दतीने डॉक्टर्स भरण्याची कार्यवाही सुरु करा. औषधसाठा पुरेसा आहे का याबाबतही सर्वच डॉक्टर्स आणि प्रांताधिकारी यांनी दक्ष रहावे. आपल्या स्तरावर बैठक घ्यावी.

     मुख्य कार्यकारी श्री पुजार म्हणाले, पूर्व तयारी आणि सतर्कतेबद्दल रुग्णालयांना भेटी देवून पाहणी केली पाहीजे. रुग्ण कल्याण समितीची बैठक झाली पाहीजे. ती झाली का ? या बाबत खात्री करावी. रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा ही पहावा. त्याचबरोबर किचनमधील स्वच्छताही पहावी.

      डॉ.जस्मीन म्हणाल्या, रुग्णांची गर्दी होत असेल, तर अशा ठिकाणी रांगेचे व्यवस्थापन करावे. त्यासाठी आवश्यक तेथे खुर्च्यांची व्यवस्था करावी. पाण्याची सुविधा वॉशरुम, हॅंडवॉश, डस्टस्बीन असाव्यात. दिव्यांगांसाठी रॅम्प आहेत का याचीही पाहणी करावी.

          प्रांतधिकारी राजश्री मोरे, जीवन देसाई, अजित थोरबोले, आकाश लिगाडे, वैशाली माने, वैद्यकीय अधिक्षक आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

रत्नागिरी : पालकमंत्र्यांच्या मान्यतेने औषध खरेदीसाठी शासकीय रुग्णालयाला 5 कोटी : जिल्हाधिकारी रत्नागिरी : पालकमंत्र्यांच्या मान्यतेने औषध खरेदीसाठी शासकीय रुग्णालयाला 5 कोटी : जिल्हाधिकारी Reviewed by ANN news network on १०/०६/२०२३ ०९:४६:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".