१५ ऑगस्टला घेतलेल्या तंबाखूमुक्तीच्या शपथेचा बोजवारा
दिलीप शिंदे
सोयगाव : भारत सरकारचा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३ तसेच इ-सिगारेट बंदी बाबतचा दि.१८ सप्टेंबर २०१९ चा अध्यादेश याची प्रभावी अंमलबजावणी होणेकरिता १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली. मात्र अध्यादेशालाच शासकीय कर्मचाऱ्यांनी तिलांजली दिल्याचा प्रकार तहसील कार्यालयात घडत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तहसील कार्यालय सुशोभित करण्यात आले होते. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापर्यंत सुशोभीकरण राहणार असून पान, तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी रंगीबेरंगी केलेल्या भिंती,खिडक्या व कोपरे मात्र स्वच्छतेसाठी अधिकारी मुहूर्त तर बघत नाहीना असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
शासकीय कार्यालयामध्ये धूम्रपान करण्यास तसेच पान, तंबाखू खाऊन थुंकण्यास सक्त मनाई असतांना देखील सोयगाव तहसील कार्यालयातील कर्मचारी, कामानिमित्त कार्यालयात आलेले नागरिक पान, मावा,गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन इमारतीच्या भिंती विद्रुप करीत असल्याचे चित्र वर्षानुवर्षं आहे. तालुक्याचे पालक असलेल्या तहसील कार्यालयाची ही दयनीय अवस्था झाल्याचे निदर्शनास येत आहे. तहसील कार्यालयाचा नुकताच पदभार स्वीकारलेले तहसीलदार मोहनलाल हरणे यांना कर्मचाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस पावले उचलावी लागणार आहेत.
या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. कर्तव्यावरील अनेक कर्मचारी कित्येक वेळा कार्यालयाबाहेरील टपऱ्यांवर जातांना दिसत असतात तंबाखूजन्य पदार्थ खाऊन कार्यालयातील खिडक्या भिंतीचे कोपरे या ठिकाणची जागा रंगीबेरंगी केल्या जात असून इमारत व त्या कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरवले जात आहे.त्यातून कामानिमित्त तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यासह कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.नायब तहसीलदार यांचे दालन असलेल्या कार्यालयाच्या भिंती आतून व बाहेरून रंगवलेल्या दिसत आहेत.या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन तहसीलदार मोहनलाल हरणे कर्मचाऱ्यांना लेखी समज देणार का? दंडात्मक व प्रशासकीय कारवाई करणार का? हा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे असून कोण पान, तंबाखू खाऊन थुंकत आहे आहे हे कळणार असून देखील तहसीलदार कारवाई करण्याच्या मन:स्थितीत नाहीत का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
Reviewed by ANN news network
on
९/०२/२०२३ ०५:५३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: