जालन्यात मराठा आरक्षण आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज! आंदोलनाला हिंसक वळण (VIDEO)

 


जालना : जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मराठा आक्रोश मोर्चाचे मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सुरू होते. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी पोलिसांबरोबर चर्चा सुरू असतानाच आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर संतप्त आंदोलकांनी तरवाली वडीगोद्री शहागड धुळे सोलापूर महामार्गावर धावणा-या पाच बसेस पेटवून दिल्या असल्याचे वृत्त आहे. 

दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोषींवर  कठोर कारवाई करणार असल्याचे सांगत आपण मराठा आंदोलकांसोबत असल्याचे  स्पष्ट केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रामाणिक भूमिका; नागरिकांनी शांतता राखावी :  मुख्यमंत्र्यांचे आवाहन


मुंबई : मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात असल्याचे सांगत मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रामाणिक भूमिका राज्य सरकारची आहे. नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

यासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, या घटनेची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतली आहे. मी या आंदोलनाच्या नेत्यांशी देखील संवाद साधला होता. त्यांच्या मुद्द्यांवर अधिकाऱ्यांकडून युद्धपातळीवर कार्यवाही सुरू असल्याचे सांगतानाच त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती देखील केली होती. मात्र आंदोलनावर ते ठाम राहिल्याने त्यांची प्रकृती खालावत होती. आज जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक त्यांना भेटायला गेले होते. त्यांची प्रकृती पाहून त्यांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी विनंती देखील त्यांनी केली होती.

 मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका राज्य शासनाची आहे. या समाजाला न्याय देण्याची भावना आणि भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.


पोलिसांची चौकशी करून दोषींवर  कठोर कारवाई करणार

आपण मराठा आंदोलकांसोबत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्ट भूमिका

मुंबई :  "मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी रास्त, न्याय्य मागणी आहे. या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे किंवा राज्यात कुठेही होणाऱ्या शांततामय आंदोलनाला आमचा, राज्यातील नागरिकांचा पाठिंबा आहे. मराठा आरक्षणाचा लढा रस्त्यावर आणि न्यायालयातही तितक्याच ताकदीने लढण्याची आपली सगळ्यांची भूमिका आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट आणि सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत. यावरच आंदोलनाचे यश अवलंबून आहे. जालना जिल्ह्यातील अंबड येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याचे  प्रथमदर्शनी दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास मी राज्यातील नागरिकांना देत आहे.  राज्यातील मराठा आंदोलनाने लोकशाही व्यवस्थेत शांततामय आंदोलनाचा आदर्श निर्माण केला आहे. हा आदर्श आणि गौरवशाली परंपरा कायम ठेऊन, कायदा सुव्यवस्था कायम राखत लोकशाही मार्गानेच हे आंदोलन पुढे जाईल, याची काळजी महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपल्याला घ्यावी लागेल. राज्य शासन आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जण मराठा आंदोलकांच्या सोबत आहे. असा विश्वास देतो. अंबड येथील घटनेतील दोषी पोलिसांवर निश्चित कारवाई करण्यात येईल, कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही." अशी स्पष्ट भूमिका मांडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण मराठा आंदोलकांसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे.

 राज्यात परिस्थिती बिघडणार नाही, शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आंदोलक आणि राज्यातील नागरिकांना केले आहे.

जालन्यात मराठा आरक्षण आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज! आंदोलनाला हिंसक वळण (VIDEO) जालन्यात मराठा आरक्षण आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज!  आंदोलनाला हिंसक वळण (VIDEO) Reviewed by ANN news network on ९/०१/२०२३ १०:२१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".