पिंपरी : महापालिकेच्या हद्दी लगत आणि विकासापासून वंचित असलेल्या हिंजवडी, माण, मारूजी, जांबे, नेरे, सांगवडे, गहुंजे या सात गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात समावेश करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यामुळे ही गावे लवकरच पालिकेत येतील असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.
खासदार बारणे यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. याबाबतचे निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, महापालिका हद्दीलगत हिंजवडी,माण,मारूंजी, नेरे, जांभे, सागंवडे, गहुंजे ही गावे आहेत. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. त्याठिकाणी मुलभूत सुविधांचा अभाव आहे. आयटीनगरी असलेल्या हिंजवडीचा,माणचा विकास होणे गरजेचे आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे ग्रामपंचायतीला नागरिकांना सुविधा देणे शक्य होत नाही. सुविधांसाठी नागरिकांनी गावांचा महापालिकेत समावेश करण्याची मागणी केली आहे. मावळ, मुळशी तालुक्यात असलेली ही गावे महापालिकेच्या अगदी जवळ आहेत.
हिंजवडी, माण या क्षेत्रात मोठ्या भागत आयटी पार्क आहे. देशभरातील नागरीक या ठिकाणी वास्तव्यास आहेत. वाढते नागरीकरण, सुविधांचा अभाव, वाहतुकीची समस्या या गोष्टींचा विचार करून ही गावे महापालिकेत येण्याची आवश्यकता आहे. गहुंजे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम आहे. या गावात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पुरेसे नसल्याने अशुद्ध पाणी थेट नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे पवना नदीचे प्रदुषण वाढले आहे.
गावांचा विकास, नागरीकांना सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात आणि अनाधिकृत बांधकाम रोखण्याच्या दृष्टीकोणातून हिंजवडी, माण, मारूंजी, नेरे, जांबे, सांगवडे आणि गहुंजे यां गावांचा महापालिका क्षेत्रात समावेश करावा अशी विनंती खासदार बारणे यांनी केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक विचार करून लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.
Reviewed by ANN news network
on
८/२१/२०२३ १२:५२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: