मराठवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यास मारहाण, तालुक्यात खळबळ, आरोग्य कर्मचारी आक्रमक, मारहाणीच्या निषेधार्थ सकाळची बाह्य रुग्णसेवा बंद....
दिलीप शिंदे
सोयगाव : सोयगाव ग्रामीण रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील गाडे यांना दि.१७ गुरुवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास काळेनगर येथील युवकाने ग्रामीण रुग्णालयात मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.आरोग्य कर्मचारी आक्रमक होत मारहाणीच्या निषेधार्थ बाह्य रुग्णसेवा बंद ठेवण्यात येऊन मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, शहरातील काळेनगर येथील रहिवाशी असलेल्या लिलाबाई कडूबा सुरडकर वय ६५ वर्षे यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दि.१७ गुरुवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील गाडे यांनी सदर महिलेला तपासून मृत घोषित केले. मयताचा नातेवाईकाने डॉ.गाडे यांच्यावर अचानक हल्ला करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.दरम्यान संबंधितांवर जो पर्यंत गुन्हा दाखल करून कारवाई केली जात नाही तो पर्यंत बाह्य रुग्णसेवा बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतल्याने आरोग्यसेवा कोलमडली होती. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
सोयगाव तालुका हा ग्रामीण भाग असून आपल्या हातून रुग्णसेवा व्हावी या हेतूने रुग्णसेवेसाठी तत्पर असतांना देखील असे प्रकार डॉक्टरांविषयी घडत असतील तर हे निंदनीय आहे.या अगोदर सुद्धा असे प्रकार घडलेले आहे.हल्लेखोरावर कठोर कारवाई व्हावी जेणेकरून पुन्हा अशा घटना होणार नाही.
- डॉ.स्वप्नील गाडे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय सोयगाव
Reviewed by ANN news network
on
८/१८/२०२३ ०६:२८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: