पिंपरी : यझाकी इंडिया या कंपनीचे व्यवस्थापक विष्णु बनकर यांना राष्ट्रीयस्तरावरील 'आयईआय् यंग इंजिनिअर्स' पुरस्कार मिळाला आहे.
दि इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), कोलकाता, पश्चिम बंगाल, येथे ३७ वी राष्ट्रीय परिषद नुकतीच उत्साहात पार पडली. यामध्ये देशभरातून विविध संशोधक व युवा वैज्ञानिक यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमामध्ये यझाकी इंडिया प्रा. लि. पुणे या कंपनीचे सिस्टम्स व पॉलिसी विभागाचे विभागप्रमुख विष्णु बनकर यांना वर्ष २०२३-२४ चे 'आयईआय् यंग इंजिनिअर्स अवॉर्ड' टेक्नो इंडिया युनिव्हर्सिटीचे उपकुलगुरु डॉ. गौतम सेनगुप्ता, प्रोडक्शन डिव्हिजन बोर्ड इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) चे अध्यक्ष डॉ. सिरम सत्यनारायणा, फ्लाक्त वुडस् लि. कंपनीचे अध्यक्ष अलोक मुखर्जी, आयआयटी खरगपूरचे डॉ. झरेस्वर मैति, डॉ. निर्मल दास, डॉ. पी. के. राय, डॉ. राजू बसक आदींच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारासाठी देशभरातून तिघांची निवड करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातून विष्णु बनकर व इतर दोघेजण पंजाब (एनआयटी) व उत्तराखंड (आयआयटी) येथील आहेत.
विष्णु बनकर यांनी शैक्षणिक, औद्योगिक तसेच संशोधनात्मक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट प्रशंसनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांचे टेक्निकल रिसर्च पेपरस् हे कॉन्फरन्स प्रोसिडिंग्स, आयएसएसएन, आयएसबीएन जर्नल्समध्ये प्रकाशित आहेत. त्यांनी विविध अभियांत्रिकी 'टेक्निक'द्वारे गुणवत्ता, उत्पादकता सुधारणा तसेच वेळ व पैसा यामध्ये बचत होऊन ग्राहक समाधानी असल्याचे सिद्ध केले. आमूलाग्र फायदेशीर शास्त्रीय बदल करून विविध फलदायी उपक्रम राबविले. त्यांना शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल विविध पुरस्कारही मिळाले आहेत तसेच कंपनीला नुकतेच वाय.सी. जपानकडून 'बेस्ट इन क्लास लेवल-१ व लेवल-२' हे दोन पुरस्कार गतिमानतेने मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली.
त्यांनी 'ए.एम्.आय्.ई' ही अभियांत्रिकीतील पदवी 'प्रथम श्रेणी'मध्ये तर 'एम्.ई.' ही अभियांत्रिकीतील 'पदव्युत्तर पदवी' सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून 'विशेष प्राविण्यासह प्राप्त केली. बनकर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 'सायन्स व टेक्नॉलॉजी' फॅकल्टीतून 'पी.एच्.डी' करत आहेत. त्यांना मिळालेल्या या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल डॉ. केशव नांदूरकर (चेअरमन बीओएस, प्रॉडक्शन इंजिनिअरिंग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), यझाकी कंपनीचे सरव्यवस्थापक तथा कारखानाप्रमुख मंगेश येवले, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ आदिंनी त्यांचे अभिनंदन केले तसेच कंपनी, पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: