वॉर रूममध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून महत्वाच्या प्रकल्पांचा आढावा

 


राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प कालबद्धरित्या पूर्ण करा:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबईच्या वाहतूक कोंडीवरील उपाययोजनेसाठी ट्विन टनेल संकल्पना वापराचा विचार

मुंबई : राज्यात सुरू असलेले विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प, मेट्रो तसेच सिंचन प्रकल्पांना तातडीने गती देऊन कालबद्धरित्या हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच मुंबईतील वाहतूक कोंडीवरील उपाययोजनेसाठी प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे ट्विन टनेल या नविन संकल्पनेचा वापर करण्यासाठी मुंबई महापालिकेने सर्व्हे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील वॉर रूममध्ये राज्यातील दहा महत्वांच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. आज झालेल्या या बैठकीमध्ये प्रामुख्याने पुणे मेट्रो, नागपूर मेट्रो, मुंबई मेट्रो, सिंचन प्रकल्प, समृद्धी महामार्गलगत इकॉनॉमिक झोन या प्रकल्पांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची कामे राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. ही कामे वेळेत सुरू झाल्यास त्याचा राज्यातील नागरिकांबरोबरच औद्योगिक विस्ताराला तसेच ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी मदत मिळणार आहे. त्यामुळे तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींची तातडीने पूर्तता करत प्रकल्पांना वेग देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुंबईतील वाहतुक कोंडी होणारी ठिकाणे आहेत तेथे ग्रेड सेपरेटर टाकून वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी मुंबई महापालिकेला निर्देश देण्यात आले. वाहतूक कोंडीतून सुटका करण्याकरिता ट्विन टनेल या नविन संकल्पनेचा वापर करण्याबाबत मुंबई महापालिकेने सर्व्हे करावा याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.  पश्चिम द्रूतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग कनेक्ट करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी मुंबई मेट्रो मार्गिका ४,चार ए, आणि ११ साठी मोगरपाडा येथे डेपो करण्याकरिता जमीनसंपदाच्या विषयाबाबत आढावा घेण्यात आला. मिठी नदी विकास व प्रदूषण नियंत्रण प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मुंबई महापालिका आयुक्तांना यावेळी देण्यात आल्या. ठाणे भिवंडी कल्याण या मुंबई मेट्रो पाचच्या मार्गिकेसाठी कशेळी येथील भूसंपादनाबाबतचा आढावा यावेळी घेण्यात आला. 

दक्षिण मुंबई परिसरातील महत्त्वाचे रस्ते, पदपथावर होणारे अतिक्रमण काढून रस्ते, चौक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याबाबत कार्यवाहीचे निर्देश महापालिका आयुक्तांना देण्यात आले. समृद्धी महामार्गालगत इकॉनोमिक झोन करण्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. निम्न पैनगंगा प्रकल्प मार्गी लावण्याबाबत जलसंपदा विभागाला मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या.

वॉर रूममध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून महत्वाच्या प्रकल्पांचा आढावा वॉर रूममध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून महत्वाच्या प्रकल्पांचा आढावा Reviewed by ANN news network on ८/२९/२०२३ ०६:०१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".