Irshalgad Landslide Video : इर्शाळगड, ठाकरवाडीवर दरड कोसळून ६ जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोक दरडीखाली अडकल्याची भिती
खालापूर : रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळगडाच्या पायथ्याशी लोकवस्तीवर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.यामध्ये १०० हून अधिक लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेत सहाजणांचा मृत्यू झाला असून ९८ व्यक्तींना शोधण्यात यश आले आहे. जखमींवर नवी मुंबई येथे उपचार सुरू आहेत; अशी माहिती सकाळी मंत्री उदय सामंत यांनी दिली. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. अनेक रेस्क्यू टीम या ठिकाणी कार्यरत आहेत.
अंधार आणि पाऊसही असल्याने बचावकार्यात प्रचंड अडथळे येत असल्याने बचावकार्य काही वेळासाठी थांबवण्यात आले होते. आता पुन्हा एकदा हे बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. शिवदुर्ग, निसर्ग मित्र, वेध सह्याद्री या टीम्स पोलीस प्रशासनाच्या मदतीने मदतकार्यात सक्रिय आहेत. रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू असून अडकलेल्या इतर लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मदत व बचावकार्याचा आढावा घेत आहेत. गिरीश महाजन, उदय सामंत, दादाजी भुसे हेही घटनास्थळी असून ते मदतकार्यावर प्रत्यक्ष लक्ष ठेवून आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार राज्य नियंत्रण कक्षात पोहोचले असून तेथून या मदतकार्यावर लक्ष देत आहेत. मंत्री अदिती तटकरे यांनी या दुर्घटनेतील जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली असून रुग्णालय प्रशासनाला योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या.
प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचावकार्यात अडथळा येत असला तरी हवामानात सुधारणा झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल. सर्व यंत्रणा बचाव कार्यासाठी सज्ज आहेत. एनडीआरएफ पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे. रस्ता नसला तरी मदतकार्य सुरू असून आत्ताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेची माहिती घेतली आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
इरशाळगड ठाकूरवाडी येथे गिरीश महाजन, उदय सामंत, दादाजी भुसे यांनी भेट देऊन आढावा घेतला.
या अनुषंगाने मदत कार्याची घेतली माहिती घेऊन प्रशासन व पोलीस मदत कार्यात गुंतलेल्या यंत्रणा, स्वयंसेवी संस्था यांच्या अडचणी दूर करण्यासाठी तातडीने सूचना दिल्या आहेत.
दुर्घटनेनंतर अलिबाग, खोपोली , कर्जत , लोणावळा , बदलापूर , पनवेल ,वाशी व मुंबई येथून मदत पथके रवाना झाली. ८ ॲम्बुलन्स, 44 अधिकारी कर्मचारी,2 जेसीबी पनवेल नगरपालिका येथून पाठविण्यात आले आहे. कर्जत येथून कळम, आंबिवली, मोहिल आदी प्राथमिक आरोग्य केंद्रचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी घटनास्थळी आहे.दुर्घटनास्थळी वाहने पोहोचण्यात अडचण असल्याने महाराष्ट्र सह्याद्री ट्रेकर ग्रुप्स, यशवंति हॅकर्स हे देखील या मदत कार्यात सहभागी झाले आहेत.
उपचारांसाठी शासकीय रुग्णालय तसेच एमजीएम हॉस्पिटल येथे बेड तयार ठेवण्यात आले असून घटनास्थळावर पाणी बॉटल्स ,ब्लॅंकेट्स ,टॉर्च ,मदत साहित्य, चादरी, बिस्कीट तसेच इतर प्रथम उपचार साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर , जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे , पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, परिस्थितीवर लक्ष ठेवून असून जिल्हा आरोग्य अधिकारी व विविध यंत्रणातील अधिकारी मदत करत सहभागी झाले आहेत.
खालापूर पोलिस ठाणे हद्दीत चौक जवळील इरसाळ वाडी येथे घडलेल्या दरड सखलन घटनेच्या अनुषंगाने चौक दूरशेत्र येथे तात्पुरते कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे.
आजूबाजूच्या शिवभोजन केंद्रावरून हे पॅकेट देण्यात येणारे, त्याच बरोबर ५ लिटर रॉकेल देण्यात येणार. १० किलो तांदूळ, १० किलो गहू किंवा त्याचे पीठ, तूरडाळ, तेल, साखर देखील देण्यात येणार आहे मंत्री छगन भुजबळ यांनी तसे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
या दुर्घटनेचे वृत्त रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांना रात्रीच कळले. त्या बरोबर रात्रीव एक वाजता सामंत घटनास्थळी पोहोचले. त्याच्या या कार्यतत्परतेचे खालापूर परिसरासह राजकीय वर्तुळात कौतुक होत आहे.
Reviewed by ANN news network
on
७/२०/२०२३ ०२:००:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: