मुंबई : संपूर्ण कोकणपट्टीत जोराचा पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. घाटमाथ्यावरून कोकणाकडे जाणा-या महाबळेश्वर नजिकच्या आंबेनळी घाटात आणि चिपळूकडे जाणा-या कुंभार्ली घाटात दरड कोसळली आहे. तर परशुराम घाटातही दरड कोसळली असून या दरडी हटविण्याचे काम सुरू आहे. पनवेल ते बेलापूर लोकल ट्रेन ठप्प झाली आहे.
आंबेनळी घाट चिरेखिंड गावाजवळ काल रात्री दरड कोसळली.पाऊस जास्त असून दगड मोठे असल्यामुळे दरड हटविण्याचे काम आज सकाळी सुरू करण्यात आले आहे घाट दोन्ही बाजूनी बंद ठेवण्यात आला आहे.
पनवेलनजिक रसायनी पोलीस स्टेशन मध्ये पाणी भरले आहे. आपटा गावात नदीकिनारी असलेल्या वस्तीत पाणी भरले असून तेथील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
पाताळगंगा नदीने धोका पातळी गाठली असून सर्व शासकीय यंत्रणा सज्ज आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले असून सध्यस्थितीत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. रीस, वाशीवली भागामध्ये पाणी साचले आहे. खोपोली श्रीरामनगर , लव्हेज येथे पाणी साचले आहे. कोणतीही अनुचित घटना अथवा जीवितहानी नाही. नागरिकांना आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
उल्हासनगरमध्ये पाच ते सात ठिकाणी पावसाचे पाणी भरले असून उल्हासनगर आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान, अग्निशामक दलाचे जवान आणि इतर यंत्रणा प्रत्यक्ष घटनास्थळी असून पाण्याचा निचरा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
बदलापूर तालुक्यातील सोनिवली व हेंद्रेपाडा येथील सुमारे 200 कुटुंबांना बदलापूर येथील बीएसयूपी इमारतीमध्ये हलविण्यात आले आहे. सोनिवली येथील यादव नगर भागातील लोकांना म्हाडा कॉलनी सोनिवली या ठिकाणी शिफ्ट करण्यात येत असून शिफ्टिंग चे काम सुरू आहे.
रायते ते दहागाव मार्गावरील उल्हास नदीवरील पुलावर पाणी गेले आहे. मुरबाड तालुक्यातील चिखले गावाला जाणाऱ्या काळू नदीवरील पुलावरून पाणी गेले आहे..मुरबाड येथिल मुरबाडी नदीवरील पुलावरूनही पाणी जात आहे. अंबरनाथ येथील सहवास वृद्धाश्रम मधील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. अंबरनाथ तालुक्यातील गोरेगाव सर्कल मधील कुरसावले पुलावरून पाणी जात आहे. कल्याण तालुक्यातील मोरया नगर, कांबा येथील 60 कुटुंबांना हलविण्यात आले आहे.
महाड येथील रायगडवाडी ते निजामपूर रस्ता पुराचे पाण्यामुळे वाहून गेला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात हर्णे फत्तेगड व राजेवाडी तसेच पाजपंढरी येथून दरडगस्त भागातील 5 कुटुंबातील 24 लोकांना यापूर्वी स्थलांतरित करण्यात आले आहे . मौजे दाभोळ येथील ढोरसई येथील आपदग्रस्त/दरडग्रस्त 5 कुटुंब व 35 लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. शिरसोली मुगिज रस्ता पाणी आल्याने वाहतूक बंद आहे जालगाव समर्थ नगर, मित्रनगर भागात अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी साचत आहे, संबधित ग्रामपंचायत मार्फत लोकांना सूचना दिलेल्या आहेत. दापोली मंडणगड रस्त्यावर झाडे पडली होती ती काढून रस्ता पूर्ववत केला आहे. सोळा घरांचे अतिवृष्टीमुळे अंशतः नुकसान झालेले आहे.
चिपळूण येथे सध्या वशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नाईक कंपनी/ मच्छी मार्केट, वडनाका, मुरादपूर येथील काही ठिकाणी १ फूट पाणी भरलेले आहे. सध्या पाणी कमी होत आहे. नगरपालिकेच्या बोटी सांस्कृतिक केंद्र, शंकरवाडी, बाजारपेठ विसर्जन घाट, ST stand, नगरपालिका कार्यालय या ५ ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. नगरपालिका पथके ९ ठिकाणी तैनात आहेत. तलाठी, पोलीस व NDRF पथके ६ ठिकाणी तैनात केलेली आहेत. एका पथकात ५ तलाठी, ३ पोलीस व ३ जवान आहेत. या पथकासोबत एकूण ४ बोटी आहेत. सध्या एका कुटुंबातील ३ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आलेले आहे. कोकण रेल्वे- कोणतीही समस्या नाही. रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे. मिरजोळी जुवाड येथील १९ कुटुंबातील ६५ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आलेले आहे. ते सर्वजण आपल्या नातेवाईकांच्या घरी स्थलांतरीत झाले आहेत. चिपळूण व खेड या दोन्ही तालुक्यांतील शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे.
कोकणपट्ट्यात अतिवृष्टी! नदीकिनारी असलेली शहरे जलमय!! (VIDEO)
Reviewed by ANN news network
on
७/१९/२०२३ ०६:४२:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
७/१९/२०२३ ०६:४२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: