इर्शाळवाडीतील बचावमोहीम थांबविली; ५७ जण बेपत्ताच!

 


अलिबाग : इरशाळवाडी येथे दरड कोसळल्यानंतर १९ जुलै पासून सुरू असलेली बचाव मोहीम आज २३ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता थांबविण्यात आली. पालकमंत्री उदय सामंत यांनी तसे जाहीर केले. दुर्घटनेतून बचावलेल्या १४४ लोकांच्या पाठीशी शासन ताकदीने उभे आहे. या लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. याबरोबरच जिल्हातील अन्य धोकादायक वाडया आणि गावांचे पुनर्वसन करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या असल्याचे प्रतिपादन सामंत यांनी यावेळी केले.

बचावकार्याचा आढावा व पाहणी संदर्भात खालापूर पोलीस स्टेशन येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी आ.महेश बालदी, आ.महेंद्र थोरवे, विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, विशेष  पोलीस निरीक्षक प्रविण पवार, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बढे , एनडीआरएफ कंमाडर श्री.तिवारी उपस्थित होते.

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, १९ जुलै रोजी इर्शाळवाडी या ठिकाणी दरड कोसळल्याने या आदिवासीवाडीतील ४३ घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली असूनवाडीतील २२८ इतकी लोकसंख्या होती.  यापैकी या दुर्घटनेत २७ लोक मृत्यूमुखी पडले, ५७ लोक बेपत्ता असून १४४ लोक हयात आहेत. या हयात असलेल्या लोकांचे तात्पुरत्या जागेत पुनर्वसन करण्यात आले आहे. तसेच त्यांना लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा शासनाकडून पुरविण्यात आल्या आहेत..

या कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी जागा निश्चित करून सिडको मार्फत सदर जागेचा विकास करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. तसेच आ.महेश बालदी यांनी विधानसभेत आयुधाद्वारे दिलेल्या माहितीनुसार 5 वाड्यांचे आणि जिल्ह्यातील 20 धोकादायक गावांचे पुनर्वसन करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही  सामंत यांनी सांगितले. 

या दुर्घटनेच्या ठिकाणी बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, टीडीआरएफ, इमॅजिका कामगार, सिडकोचे  कर्मचारी तसेच इतर सामाजिक स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी अशा एकूण जवळपास १ हजार १०० लोकांनी उत्तमरित्या काम केले त्यांचे शासनामार्फत आभार मानले. भविष्यात अशी दुर्देवी घटना घडू नये म्हणून शासन व जिल्हा प्रशासन खबरदारी घेईल असेही  सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. 

 याठिकाणी काही ट्रेकर्स, पर्यटक, काही लोक येथील झालेली घटना बघण्यासाठी येण्याची शक्यता आहे. याठिकाणी जिल्हा प्रशासनाने १४४ कलम लागू केले आहे. तरी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 



इर्शाळवाडीतील बचावमोहीम थांबविली; ५७ जण बेपत्ताच! इर्शाळवाडीतील बचावमोहीम थांबविली;  ५७ जण बेपत्ताच! Reviewed by ANN news network on ७/२३/२०२३ ०९:५१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".