पुणे :जन्महिंदुपेक्षा कर्महिंदु असणे अधिक महत्त्वाचे आहे. हिंदु धर्मामध्ये 365 दिवसांपैकी साधारण 150 दिवस काहीतरी सण-उत्सव-व्रत-वैकल्ये असतात. हे धर्मशास्त्राप्रमाणे साजरे केले, तर कुटुंबियांवर धर्मसंस्कार होतील. कुटुंबातील मुलांचे मन धर्मपरायण होईल. धर्म आचारशील असतो. धर्माचरण केले, साधना केली, तरच खर्या अर्थाने धर्माचे आणि आपलेही रक्षण होते. साधनेमुळेच अंतरातील दिव्य ऊर्जा जागृत होते. मनोबल वाढते. आत्मशक्ती जागृत होते. या दिव्यशक्तीच्या आधारे हिंदु धर्माचे, या देवभूमी भारताचे रक्षण सहजसुलभ होणार आहे. त्यामुळे देवभूमी भारताचे रक्षण आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हिंदूंनी साधना करण्याचा निश्चय करावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. गुरुपौर्णिमेनिमित्त दिघी येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पुणे जिल्ह्यात एकूण 8 ठिकाणी संपन्न झालेल्या महोत्सवाला 3625 पेक्षा अधिक संख्येने जिज्ञासूंनी सहभाग घेतला. देशभरात 72 ठिकाणी महोत्सव साजरा करण्यात आला.
याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू श्री. सात्यकी सावरकर यांनी सिंहगड रस्ता येथे उपस्थितांना मार्गदर्शन केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी यांनी धनकवडी येथे तसेच श्री.पराग गोखले यांनी सिंहगड रस्ता येथे, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर, कु. क्रांती पेटकर यांनी एरंडवणे येथे, स्वा. सावरकर युवा विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर, कु. प्राची शिंत्रे यांनी हडपसर येथे तसेच ह.भ.प. राजेंद्र महाराज शास्त्री आणि सनातन संस्थेच्या सौ. ज्योती दाते यांनी भोर येथे उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आज हिंदू समाजासमोर जी आव्हाने निर्माण झाली आहेत त्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार उपयुक्त आहेत असे परखड मत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चुलत नातू श्री. सात्यकी सावरकर यांनी व्यक्त केले. श्री. विद्याधर नारगोलकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर असलेले विविध आक्षेप आणि खंडन या विषयावर उपस्थितांना संबोधित केले.
महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. स्वसंरक्षण प्रात्यक्षिके ही दाखवण्यात आली. या ठिकाणी अध्यात्मिक ग्रंथ प्रदर्शन, सात्त्विक उत्पादने आणि धर्मशिक्षण देणारे फलक प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला !
Reviewed by ANN news network
on
७/०४/२०२३ ०८:३८:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: