मुंबई : पावसाळी अधिवेशनाला आज धमाकेदार सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी काँग्रेस पक्षाने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारचा निषेध केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. सत्ताधाऱ्यांकडून समर्पक उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी सभात्याग केला.
संसद आणि विधिमंडळातील दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक होत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 50 खोके, एकदम ओके... अशी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी ‘असंविधानिक कलंकित सरकारचा धिक्कार असो’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले होते.
दरम्यान, सरकारने शेतकऱ्यांना 10 हजार कोटींची मदत दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दुबार पेरणीचे संकट आल्यास सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील. बोगस बियाणे पुरवठा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत नव्या मंत्र्यांची ओळख करून दिली. दरम्यान, बच्चू कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच गाडीतून वर्षाहून विधानभवनाच्या दिशेने निघाले होते. त्यामुळे चर्चा सुरू झाल्या. आमदार बच्चू कडू यांनी मी मुख्यमंत्र्यांसोबत गाडीत आलो असतानाही मंत्रिपदाची चर्चा झाली नाही, असे सांगून ते नाराज नसल्याचे त्यांनी सांगितले.
शरद पवारांचा गट गायब
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला. यावेळी काँग्रेस आणि ठाकरे आमदार उपस्थित होते. मात्र, शरद पवार यांच्या गटातील एकही आमदार पायऱ्यांवर उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
Reviewed by ANN news network
on
७/१७/२०२३ ०१:१९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: