मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतले ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन


सुलोचनादीदींच्या जाण्याने अवघी चित्रपटसृष्टी पोरकी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 मुंबई  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभादेवी येथील निवासस्थानी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी आमदार सदा सरवणकर, अभिनेते सचिन पिळगावकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “सुलोचनादीदींचे निधन ही अत्यंत दुःखद, रसिकांच्या मनाला चटका लावणारी घटना आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टी पोरकी झाली आहे. त्या चित्रपटसृष्टीतल्या मूर्तिमंत वात्सल्य होत्या. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला. विशेषकरून त्यांनी साकारलेली ‘आई’ ची भूमिका ठसा उमटवणारी ठरली. ज्येष्ठ अभिनेते देवानंद, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्या सारख्या दिग्गज कलावंतांसोबत त्यांनी चित्रपटांत काम केले. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मायेची पखरण करणा-या वात्सल्यमूर्ती हरपल्या. त्यांच्या जाण्याने प्रत्येकालाच वाटते की आपल्यातलेच कुणी गेले आहे. इतका प्रेम, जिव्हाळा त्यांनी निर्माण केला आहे”, या शब्दांत राज्य शासनाच्यावतीने सुलोचनादीदींना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

सुलोचनादीदींची कारकीर्द अनेकांना प्रेरणादायी ठरेल :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये काही नावं अशी आहेत. ज्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे ती अजरामर आहेत. चित्रपटसृष्टीत त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. यातीलच एक नाव सुलोचनादीदींचे आहे. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी नायिकेच्या भूमिका साकारल्या. नंतर आईच्या भूमिका साकारल्या, त्या अत्याधिक लोकप्रिय झाल्या. माझ्या पिढीने त्यांना आईच्या रुपात बघितले आहे. अतिशय सोज्वळ आणि ममत्त्व वाटावे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. सुलोचनादीदींची कारकीर्द अतिशय थक्क करणारी आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. या पुरस्कारांपेक्षाही त्यांचे कार्य मोठे होते. त्यांनी गाजवलेली कारकीर्द अनेकांना प्रेरणादायी ठरेल”, अशा शब्दात श्री. फडणवीस यांनी विनम्र श्रद्धाजली अपूर्ण केली.  

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सुलोचनादीदींच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतले ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतले ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन Reviewed by ANN news network on ६/०५/२०२३ ०२:१८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".