ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी विदयार्थी मंडळाचे आयोजन
पुणे : ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी विदयार्थी मंडळाच्या - कला आणि संस्कृती विशेष उद्दिष्ट गटाने ‘आर्टिस्ट कट्टा ‘ या संस्थेच्या सहकार्याने ८ ते ११ जून दरम्यान ‘प्रतिमा उत्कट – रंग कथा २३ ‘ या चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. मिलिंद संत, अस्मिता अत्रे, अमिता पटवर्धन, डॉ. समीर दुबळे, चेतना गोसावी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.'कला आणि संस्कृती विशेष उद्दिष्ट गट' हा विविध कला प्रकारात काम करणाऱ्या ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने सुरू झालेला एक महत्वाचा गट आहे.या गटाने या कला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
'प्रतिमा उत्कट- रंगकथा २३' हे चित्र प्रदर्शन दि.८ ते ११ जून २०२३ या काळात बालगंधर्व कला दालन, पुणे येथे होणार असून, ८ जून रोजी सायं. ५.३० वा. कला दिग्दर्शक श्याम भुतकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेचे विश्वस्त प्रदीप रावत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.उद्घाटनानंतर श्याम भुतकर यांच्याबरोबर त्यांचा कलाप्रवास व कलाआस्वाद याविषयी नाट्यकलाकार व दिग्दर्शक अमित वझे व चित्रकार अस्मिता अत्रे संवाद साधतील.
त्यानंतर पुढचे तीन दिवस सकाळी १० ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील. या प्रदर्शनाचे वैशिष्टय़ म्हणजे यामधे ८० हून अधिक कलाकारांनी विविध विषयांवर विविध माध्यमातून काढलेली चित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत.दुसरे वैशिष्टय़ म्हणजे हे कलाकार वय वर्षे १० ते ८५ अशा विविध वयोगटातील आहेत. तसेच विशेष नमूद करण्यासारखी बाब म्हणजे यातील काही कलाकार नागरी वस्तीतील आहेत तर काही दिव्यांग माजी सैनिक आहेत.
याशिवाय प्रत्येक दिवशी प्रदर्शनाबरोबरच अनेक मान्यवर कलाकारांची प्रात्यक्षिके आणि संवाद सत्रे आयोजित केलेली आहेत. त्यात ९ जून रोजी सकाळी साडे दहा वाजता सुरभी गुळवेलकर-साठे यांचे प्रात्यक्षिक, सायंकाळी साडे पाच वाजता चंद्रमोहन कुलकर्णी यांच्याबरोबर संवाद, १० जून रोजी सकाळी साडे दहा वाजता दीपककुमार शर्मा यांचे प्रात्यक्षिक, सायंकाळी साडे पाच वाजता मिलिंद मुळीक आणि मंजिरी मोरे यांच्याबरोबर संवाद, ११ जून रोजी सकाळी साडे दहा वाजता सायली भगली-दामले यांचे प्रात्यक्षिक, सायंकाळी ४ वाजता डॉ मुक्ता अवचट-शिर्के यांचे प्रात्यक्षिक अशी विविध सत्रे होणार आहेत. ११ जून रोजी सायंकाळी ६ वाजता समारोप कार्यक्रम होणार आहे.
कलांच्या माध्यमातून आनंद निर्मितीचा प्रयत्न
पुण्यातील नामवंत शैक्षणिक संस्था असलेल्या ज्ञान प्रबोधिनी शिक्षण क्षेत्रातील आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यामुळे सुपरिचित आहे. ज्ञान प्रबोधिनी प्रशाळेचा सुवर्ण महोत्सव २०१९ मध्ये साजरा झाला आणि त्या निमित्ताने ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी विदयार्थी मंडळाची ( JPPAF ) स्थापना झाली. त्यानंतर विविध क्षेत्रातील माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने वेगवेगळे विशेष उद्दिष्ट गट कार्यरत झाले. कला आणि संस्कृती विशेष उद्दिष्ट गट हा विविध कला प्रकारात काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने सुरू झालेला एक महत्वाचा गट आहे.
सर्व प्रकारच्या कलांच्या जोपासनेसाठी कलाकारांनी, रसिकांनी , आस्वादकांनी, कलेला आर्थिक पाठबळ देऊ शकणाऱ्या दानशूर व्यक्ति,आणि संस्थांनी एकत्रित येऊन कलांच्या माध्यमातून आनंद निर्माण करावा आणि समाज स्वस्थ, सुसंस्कृत, समावेशक विचारांची कास धरणारा व्हावा यासाठी प्रयत्न करण्यासाठी हा गट विविध उपक्रम, कार्यक्रम, व्याख्याने, मेळावे आयोजित करत असतो.
या निमित्ताने कला आणि संस्कृती विशेष उद्दिष्ट गटाच्या उपक्रमात ज्यांना सहभागी व्हायचे असेल अथवा त्याबद्दल माहिती करून घ्यायची असेल त्यांनी प्रदर्शन स्थळी आपले नाव नोंदवावे म्हणजे पुढील उपक्रमांबद्दल कळवणे शक्य होईल.
अनेकांच्या मनात अनेक कला प्रकारा विषयी आस्था असते, करून पाहायची इच्छा असते पण नेमके काय करावे हे लक्षात येत नाही किंवा आपल्या कला गुणांना व्यासपीठ कसे मिळवावे याबद्दल कल्पना नसते. अशा सर्व समाज घटकांनी मोकळेपणानी व्यक्त होण्यासाठीच कला आणि संस्कृती विशेष उद्दिष्ट गट कार्यरत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: