पिंपरी : वारीच्या स्वागतासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज

 


पिंपरी :  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. यंदाची वारी हरितवारी-निर्मलवारी-प्लास्टिकमुक्त वारी करण्याच्या संकल्पपुर्तीसाठी आपण कृतीशील सहभाग नोंदवावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले. आषाढीवारीच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने स्थापत्य, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षा व्यवस्थेबरोबरच यंदाची वारी पर्यावरणपूरक,प्लास्टिक मुक्त, हरितवारी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले असून त्या अनुषंगाने संबंधित विभागांना तातडीने कामकाम करण्याच्या, आपसात समन्वय राखण्याच्या सूचना महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या.      

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज  आणि जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने वारकऱ्यांकरिता पुरविण्यात येणा-या विविध सेवासुविधांचे आणि इतर नियोजन करण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत मधुकरराव पवळे सभागृह येथे आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम,  तसेच विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी महापालिकेच्या वतीने सुक्ष्मनियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्ग तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी नियंत्रण आणि समन्वय ठेवण्यासाठी ग्रुप कमांडर, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पालखी मार्गावर प्रति २०० मीटर अंतरावर १० अधिकाऱ्यांच्या पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. अशी १२ पथके पालखी मार्गावर तैनात असतील. या पथकांना २०० मीटरचा भाग निश्चित करून देण्यात आला आहे. शिवाय महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यात येणार आहे. वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये यासाठी या पथकांद्वारे काम करण्यात येणार आहे. अपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मुख्य नियंत्रण कक्षाला सुचित करून सर्व यंत्रणा तात्काळ कार्यरत होतील अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे.

संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम आकुर्डी येथे असतो. याठिकाणी नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. शिवाय दिंड्यांच्या मुक्कामासाठी महापालिकेने शाळा उपलब्ध करून दिल्या आहेत. याठिकाणी स्वतंत्र समन्वय नेमण्यात आले असून महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र शौचालय, स्नानगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे.

पालखी मुक्काम तसेच पालखी मार्गावर तात्पुरत्या विश्रांती कक्ष तयार करण्यात आले असून यामध्ये महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन व वेंडिंग मशिन ठेवण्यात आली आहे. स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्षाची सोयदेखील करण्यात आली आहे. वैद्यकीय सुविधा, औषधे यांच्यासह फिरती रुग्णवाहिका पालखी मार्गावर उपलब्ध असणार आहे. वैद्यकीय पथकामध्ये स्त्री रोग तज्ञांची नेमणूक देखील करण्यात आली आहे. संत तुकाराम महाराज पालखीसोबत देहू ते पंढरपूरपर्यंत कर्मचाऱ्यांसह अग्निशामक वाहन, पिण्याच्या पाण्याचे टॅंकर दिले जाणार आहेत.

यावर्षी दिंडी प्रमुखांचे स्वागत करताना महापालिकेच्या वतीने त्यांना कापडी पिशवी, प्रथमोपचार पेटी, रोप तसेच झाडांच्या बियांचे वाटप करण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने सेवासुविधांमध्ये कमतरता राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊन यंदाची वारी आनंदी वातावरणात पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करेल, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

पालखी सोहळ्यासाठी सेवा सुविधा पुरविताना महापालिकेचे विविध विभाग तसेच पोलीस यंत्रणा, महावितरण, अन्न व औषध प्रशासन, परिवहन आदी सर्व यंत्रणांनी आपसात समन्वय ठेवावा असे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी प्रशासनाला दिले.


पिंपरी : वारीच्या स्वागतासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज पिंपरी : वारीच्या स्वागतासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज Reviewed by ANN news network on ६/०८/२०२३ ०२:४१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".