दिलीप शिंदे
सोयगाव : सोयगाव सह तालुक्यात रविवारी दुपारी चक्री वादळासह मान्सून पूर्व पाऊस झाल्याने सोयगाव तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले.
दरम्यान सोयगाव तालुक्यातील अनेक घरांवरील पत्रे हवेत उडाले तर शेतातील अंथरलेल्या ठिबक सिंचनच्या नळ्या गायब झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा मन:स्ताप झाला आहे सोयगाव-बनोटी रस्त्यावर झाडे उन्मळून आडवी झाली असून जरंडी गावाजवळ झाडे आडवी झाल्याने सोयगाव-बनोटी रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. सोयगाव, जरंडी, माळेगाव, पिंप्री, गलवाडा, कंकराळा, निंबायती, बहुलखेडा, निमखेडी, उमर विहिरे, तिखी घोसला आदी गावातील घरांवरील पत्रे हवेत उडाले त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले.
सोयगाव शहरात वादळाचा मोठा फटका बसला असून शहरात विष्णू सांडू मनगटे, ईश्वर सांडू मनगटे व सुरेश लक्ष्मण मनगटे यांच्या घरांवर झाड कोसळून घरांचे नुकसान झाले आहे यामध्येविष्णू मनगटे यांच्या घराचे पत्रे वाकले, भिंतीला तडे गेले आहे्त. जरंडी, माळेगाव, पिंप्री, कंकराळा, आदी गावातही घरांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने सोयगाव तालुक्यातील नुकसानीची माहिती संकलित केली आहे.
तासभर झालेल्या चक्रीवादळाचा फटका शेतातील हंगामीपूर्व मशागतीच्या कामांना बसलेला असून शेतातील ठिबकच्या नळ्या गायब झाल्या आहेत. धनवट शिवारात धनवट येथील गट न 87अ सबिरखा मुनीरखा पठाण यांच्या घराशेजारची डी पी जळाल्याने दोन बैल व एक वासरू जखमी झाले आहे. महसूल विभागाने नुकसानीचा पंचनामा करून प्राथमिक अहवाल सादर केला आहे.दरम्यान जरंडी आणि कंकराळा या दोन्ही गावात पन्नासपेक्षा जास्त घरांवरील पत्रे उडाले आहेत. सोयगाव-बनोटी रस्त्यावर उन्मळून पडलेल्या झाडांना बाजूला करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: