पुणे : बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी आज नऱ्हे, आंबेगाव येथे शिवसृष्टीला भेट देऊन पाहणी केली.
महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर, सुनील मुतालिक, शिवसृष्टी प्रकल्पाचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार, तहसीलदार किरण सुरवसे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी मंत्री श्री. भुसे यांनी महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टी प्रकल्पातील सुरू असलेल्या पहिला टप्प्यातील सरकार वाडा अंतर्गत महत्वाचे गडकिल्ल्यांची माहिती असलेले दुर्गवैभव, रणांगण : युद्धक्षेत्र, श्रीमंत योगी आज्ञापत्र, आग्र्याहून सुटका, शस्त्रांची गॅलरी, सिंहासनाधीश्वर, राज्याभिषेकाचे दालन येथे भेटी देऊन उत्सुकतेने माहिती घेतली. त्यांनी श्रीमंत योगी आणि आग्र्याहून सुटका या प्रसंगाचे दृकश्राव्य सादरीकरण प्रत्यक्ष पाहिले.
३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्याला रायगड येथे उपस्थित राहिल्यानंतर लगेच येथे शिवसृष्टीला भेट देता आली याचा आनंद व्यक्त करून मंत्री श्री. भुसे म्हणाले, स्व. बाबासाहेब पुरंदरे यांनी आपले संपूर्ण जीवन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याची आणि पराक्रमाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यतीत केले. त्यांचा संकल्प शिवसृष्टीच्या कामाला गती देऊन महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान पुढे नेत आहे. हा अवर्णनीय असा प्रकल्प आहे. राज्य शासनाकडून या प्रकल्पाला ५० कोटी रुपये देण्यात आले असून भविष्यातही सहकार्य केले जाईल. कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अधिकाधिक तरतूद उपलब्ध होण्यासाठी सहकार्य करण्यात येईल असेही ते म्हणाले.
यावेळी विश्वस्त श्री. कुबेर यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली. हा एकूण ४३८ कोटी रुपये खर्चाचा एकूण ४ टप्प्याचा प्रकल्प असून ६० कोटी रुपये खर्चून पूर्ण झालेला पहिल्या टप्पा कार्यान्वित आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम गतीने सुरू असून पुढील वर्षी शिवराज्याभिषेक दिनापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. २०२६ पर्यंत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.
Reviewed by ANN news network
on
६/०२/२०२३ ०७:२३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: