हडपसर : सासवड रस्ता पदपथालगत साफसफाई करीत असताना भरधाव एका चार चाकीने धडक दिल्याने महानगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचारी महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादाकय घटना समोर आली आहे.
छाया भजनदास शिंदे (वय ४५, रा. विशाल झोपडपट्टी, आकाशवाणी, हडपसर) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. आज (ता. ५) सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
छाया शिंदे या पालिकेच्या सातववाडी आरोग्य कोठीकडे कंत्राटी स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करीत होत्या. हडपसर-सासवड महामार्गावर सातववाडी जवळ त्या नेहमीप्रमाणे झाडलोट करीत होत्या. त्यावेळी सासवडकडे जाणाऱ्या एका खासगी प्रवासी मोटारीने पदपथावरील वडाच्या झाडाला धडक देऊन पुढे स्वच्छतेचे काम करणाऱ्या छाया यांना धडक देऊन फरपटत नेले. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. अधिक तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: