पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील मोहननगर, काळभोरनगर, आकुर्डी, चिंचवड स्टेशन परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेने रात्रीच्या वेळी ’कुत्री पकडण्याचे पथक’ तैनात करावे अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी पालिकेकडे केली आहे.
भापकर यांनी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, रामनगर, महात्मा फुलेनगर, दत्तनगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा प्रचंड वावर असून त्यामुळे येथील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार यांना त्याचा त्रास होत आहे.
या परिसरात मोकाट कुत्री रात्रीच्या वेळेस खूप जोर जोरात भुंकतात. त्यामुळे नागरिकांची झोपमोड होते. लहान मुले घाबरून जागी होतात. हे मोकाट कुत्रे लहान मुले, महिलांच्या अंगावर धावतात, त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.महापालिकेने विशेष मोहीम राबवून मोकाट कुत्री पकडावीत. योग्य त्या उपाययोजना कराव्यात. रात्रीच्या वेळी “कुत्री पकडण्याचे पथक”तैनात करावे. प्रशासनाने याबाबत योग्य कारवाई केली नाही. तर आंदोलन करण्याचा इशाराही भापकर यांनी निवेदनात दिला आहे.
दरम्यान भापकर यांच्या या इशा-यामुळे कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणा-या संस्थांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या संस्था पालिकेकडून निधी घेऊन केवळ कागदोपत्री निर्बिजीकरण केल्याचे दखवत आहेत की काय असा प्रश्न नागरिकात चर्चिला जात आहे. दरम्यान पालिकेचे काही अधिकारीच या ठेक्यात बेनामी ठेकेदार असल्याचीही चर्चा सुरू आहे.
Reviewed by ANN news network
on
५/३०/२०२३ ०९:३३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: