कोकण : आम्ही तुमच्यासारखे सत्तेसाठी मिंधे झालेले नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड या माजी मंत्री रामदास कदम यांच्या गावी आज सायंकाळी झालेल्या विराट सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ मार्च रोजी खेडमध्येच झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. काही दिवसांपूर्वी याच मैदानात फ़ुसका, आपटी बार येऊन गेला. त्याला काय उत्तर देणार उत्तर तर आरोप किंवा टीकेला द्यायचे असते. थयथयाट आणि आदळाआपटीला काय उत्तर देणार? मागील सहा महिने सर्वत्र हाच प्रकार चालू आहे. त्याला उत्तर देण्यात अर्थ नाही असा टोला शिंदे यांनी ठाकरे यांना हाणला.
ते पुढे म्हणाले हा शिंदे गद्दार नाही, खुद्दार आहे, शिंदेच्या रक्तात बेईमानी नाही, आम्ही तुमच्यासारखे सत्तेसाठी मिंधे झालेले नाही, ज्या काँग्रेसने देशाला लुटलं, ज्यांनी मुंबईत बाँबस्फोट घडवले त्यांच्यासोबत केवळ सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसलात. काश्मीरमध्ये 370 कलम नरेंद्र मोदी यांनी हटवलं, ज्यांनी राममंदिराची उभारणी केली, ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण केलं, त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका आम्ही घेतली ती चुकीची कशी असा सवाल एकनाथ शिंदे यांनी विचारला.
शिंदे ठाकरे यांना उद्देशून म्हणाले, आधी मी मुख्यमंत्री होणार नाही म्हणालात. मग शरद पवार यांनी म्हटलं म्हणून मुख्यमंत्री झालो, असे सांगत मुख्यमंत्री झालात. काही हरकत नाही पण, त्यानंतर हिंदुत्वाचा विचार बाजूला सारलातआणि राहुल गांधी यांना पंतप्रधान करायला निघालात. याच राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केला. त्यावर मूग गिळून गप्प बसलात हे कसले हिंदुत्व? तुम्ही हिंदुत्वाची कास सोडली. हिंदुत्वाच्या विचाराशी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी बेईमानी केली. स्वाभिमान सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला. त्यामुळे आम्हाला हा मार्ग पत्करून बाळासाहेबांचा विचार जपावा लागला असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
आम्ही शिवसेनेसाठी आयुष्य घालवले, केसेस अंगावर घेतल्या आम्हाला तुम्ही गद्दार आणि खोके म्हणता,तुम्हाला बोलताना थोडेतरी काही वाटले पाहिजे. या एकनाथ शिंदेच्या अंगावर 109 केसेस आहेत. तुमच्यावर किती केसेस आहेत? तुम्हाला बोलायचा अधिकार आहे काय? असेही शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले.
Reviewed by ANN news network
on
३/१९/२०२३ १०:३८:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: