पिंपरी : आमदार अश्विनी जगताप यांची औंध जिल्हा रुग्णालयास भेट

 


रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे दिले आदेश

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील पहिल्या लोकनियुक्त व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी निवडून आल्यानंतर चौथ्याच दिवशी सोमवारी (दि. ६) सांगवी येथील औंध ऊरो जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयाच्या सर्व विभागांची पाहणी करून त्यांनी अनेक रुग्णांशी संवाद साधला. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सोयीसुविधांचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांसह रुग्णालयाच्या प्रशासनातील अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून रुग्णांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.

चिंचवड मतदारसंघाचे भाजप आमदार दिवंगत लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनामुळे या मतदारसंघात नुकतीच निवडणूक पार पडली. त्यामध्ये दिवंगत लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा विजय झाला. चिंचवड मतदारसंघातील जनतेने त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले. आमदार झाल्यानंतर त्यांनी चौथ्याच दिवशी सांगवी येथील औंध ऊरो जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप हे देखील औंध ऊरो जिल्हा रुग्णालयात रुग्णांना उत्तम प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कायम आग्रही असायचे. त्यांनी या रुग्णालयात आमदार निधीतून अनेक चांगल्या सुविधाही उपलब्ध केल्या होत्या.

आता त्यांच्यानंतर आमदार झालेल्या त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांनीही औंध ऊरो जिल्हा रुग्णालयाला भेट देत रुग्णांसाठी असलेल्या सुविधांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आदी उपस्थित होते. आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी रुग्णालयातील प्रत्येक विभागात जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधांबाबत माहिती घेतली. अनेक रुग्णांशी संवाद साधून रुग्णालयात येणाऱ्या अनुभवाबाबत माहिती घेतली. काही महिला रुग्णांनी आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या गळ्यात पडून हंबरडा फोडला. त्यांना धीर देत त्यांनी काहीही काळजी न करण्याचे आवाहन केले. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना उपचार मिळतात का, याची तेथील डॉक्टरांकडेही त्यांनी विचारणा केली. रुग्णालयातून नागरिक परत गेले नाही पाहिजेत, अन्यथा तुमच्यावर ऍक्शन घेईल. मी उद्या पुन्हा रुगणालयाला भेट देईल, असे म्हणत त्यांनी डॉक्टरांना सज्जड दम भरला.

रुग्णांना मुबलक प्रमाणात औषधे, महिलांच्या प्रसुतीगृहात विविध सुविधा, डायलिसिस युनिट तसेच नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या दहा डायलिसिस बेड तातडीने रुग्णांना उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले व इतर डॉक्टरांना दिले. सांगवीतील औंध ऊरो जिल्हा रुग्णालयात जिल्हाभरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णांना चांगला वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी नेहमीच प्रयत्न केले होते. मी सुद्धा त्याचा पाठपुरावा करून रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी या रुग्णालयाला दिलेल्या भेटीसंदर्भात बोलताना सांगितले.    

त्यानंतर त्यांनी याच रुग्णालयात आयोजित केलेल्या जनऔषधी सप्ताह कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त एस. व्ही. प्रतापवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आदी उपस्थित होते. गोरगरीब रुग्णांना स्वस्त जेनेरिक औषधे उपलब्ध करून देणे काळाजी गरज असल्याचे सांगितले. त्यासाठी या रुग्णालयात जेनेरिक औषध केंद्र सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला केली.

 


पिंपरी : आमदार अश्विनी जगताप यांची औंध जिल्हा रुग्णालयास भेट पिंपरी : आमदार अश्विनी जगताप यांची औंध जिल्हा रुग्णालयास भेट Reviewed by ANN news network on ३/०७/२०२३ ०२:२२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".