पिंपरी : आंबी येथील डॉ. डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याचा आज ७ मार्च रोजी दुपारी वराळे येथे इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाला. रंग खेळून झाल्यानंतर काही विद्यार्थी हातपाय धुण्यासाठी वराळे येथे इंद्रायणी नदीवर गेले होते. त्यात या विद्यार्थ्याचा समावेश होता.
जयदीप पुरुषोत्तम पाटील (वय २१, रा. तारखेड, पाचोरा जि. जळगाव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो संगणक अभियांत्रिकीच्या तिसरया वर्षात शिकत होता. तो आपल्या मित्रांसह हातपाय धुण्यासाठी गेला असता पाय घसरून नदीत पडला. पोहोता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. हा प्रकार घडल्यानंतर जयदीपचा मित्र शरद शिवाजी राठोड याने तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये खबर दिली.
त्यानंतर पोलीस निरीक्षक रणजित सावंत, पोलीस उपनिरीक्षक कोंडीभाऊ वालकोळी, पोलीस अंमलदार युवराज वाघमारे, सचिन कचोळे, शिवाजी बांगर यांच्यासह वन्यजीवरक्षक, मावळ या संस्थेचे संस्थापक निलेश गराडे आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बोटीच्या साहाय्याने दोन तास शोध घेऊन मृतदेह नदीतून शोधून बाहेर काढला.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कोंडीभाऊ वालकोळी करत आहेत.
Reviewed by ANN news network
on
३/०७/२०२३ ०७:३६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: