महिला स्वावलंबी होत नाहीत तोपर्यंत समाजाच्या प्रगतीला मर्यादा : पालकमंत्री चंद्रकांत पाटील (VIDEO)

 


पिंपरी : महिला स्वावलंबी होत नाहीत तोपर्यंत समाजाच्या प्रगतीला मर्यादा आहेत. महिला बचत गटांना प्रशिक्षण आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास ते अधिक सक्षमपणे काम करतील. बचत गटांनी नागरिकांची गरज ओळखून नवे उत्पादन आणि सेवा देण्याचा प्रयत्न करावा. त्या दृष्टीने समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचे सक्षमीकरण आवश्यक आहे, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.



पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सांगवी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर आयोजित पवनाथडी यात्रेला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट दिली आणि सहभागी बचत गटांना शुभेच्छा दिल्या, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार उमा खापरे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, माजी महापौर माई ढोरे, उपायुक्त चंद्रकांत इंदलकर , विशेष अधिकारी किरण गायकवाड, समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार , नामदेव ढाके, माजी नगरसदस्य शंकर जगताप, सुरेश भोईर, सागर आंगोळकर , हर्षल ढोरे, अभिषेक बारणे , शत्रुघ्न काटे , अंबरनाथ कांबळे, शशिकांत कदम, विनायक गायकवाड, माजी नगरसदस्या माधवी राजापुरे, उषा मुंडे, शारदा सोनवणे यांच्यासह महिला बचत गटाचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, महिला स्वावलंबीकरण समाजाच्या प्रगतीला पोषक असते. महिला बचतगटांना नवतंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ याबद्दलचे प्रशिक्षण आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास ते अधिक सक्षमपणे काम करतील. बचत गटांनी नागरिकांची गरज ओळखून नवे उत्पादन आणि सेवा देण्याचा प्रयत्न करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. बचतगटांना असे नवे प्रयोग करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल असेही श्री.पाटील म्हणाले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पवनाथडी यात्रेच्या माध्यमातून विविध बचत गटांना चांगली संधी उपलब्ध करून दिल्याचे सांगून अशा उपक्रमाद्वारे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला गती मिळेल, असे पालकमंत्री म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

यावेळी पालकमंत्री श्री पाटील यांनी पवनाथडीतील महिला बचत गटांच्या स्टॉलला भेट देऊन तेथील काही वस्तू देखील खरेदी केल्या.





पवनाथडी जत्रेविषयी...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाकडील महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत महापालिका हद्दीतील महिला बचतगट, वैयक्तिक महिला यांनी तयार केलेल्या वस्तू उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांना मार्केटिंग कौशल्ये ज्ञात व्हावीत, महिला उद्योजिका तयार होऊन महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात या हेतूने पवनाथडी जत्रेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. 

महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या विविध प्रकारच्या चटण्या, पापड, लोणची, जाम, जेली, विविध प्रकारचे मसाले, विविध गृहोपयोगी उत्पादने, दैनंदिन वापराच्या वस्तु, हस्तकला निर्मित उत्पादने यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचा समावेश विक्री स्टॉलमध्ये आहे. खवैय्यांना महिलांनी तयार केलेले चुलीवरचे वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, शाकाहारी मासवडी, खानदेशी पुरणाचे मांडे, झणझणीत चुलीवरचं मटण, खेकडा करी, कोंबडी वडे, दमबिर्याणी, कुरकुरीत मच्छी फ्राय अशा मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.

जत्रेमध्ये नागरिकांच्या मनोरंजनासाठी रोज सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पवनाथडी जत्रेत एकूण ४०० इतकी स्टॉल आहेत, तर सुमारे ७०० बचगटांनी यात्रेत सहभाग घेतला आहे. बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू विक्रीचे स्टॉल यात्रेत आहेत.


मी घाबरत नाही; काळजी घेतो!

सांगवी येथे महापालिकेच्या पवनाथडी जत्रेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी फेसशिल्ड घातले होते. याविषयी बोलताना मंत्री पाटील म्हणाले; मी  माझ्या डोळ्याच्या सुरक्षेसाठी फेसशिल्ड घातले आहे मी घाबरत नाहीमाझे कार्यकर्ते आणि पोलीस झोपलेले नाहीत.

मागील आठवड्यात चिंचवड येथे पाटील यांच्या अंगावर काही व्यक्तींनी शाई फ़ेकली होती. त्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून  पवना थडी जत्रेत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

महिला स्वावलंबी होत नाहीत तोपर्यंत समाजाच्या प्रगतीला मर्यादा : पालकमंत्री चंद्रकांत पाटील (VIDEO)  महिला स्वावलंबी होत नाहीत तोपर्यंत समाजाच्या प्रगतीला मर्यादा : पालकमंत्री चंद्रकांत पाटील (VIDEO) Reviewed by ANN news network on १२/१७/२०२२ ०६:५१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".