ठाणे : अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारकांना राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या ‘आनंदाचा शिधा’ किटच्या वाटपास आज ठाणे जिल्ह्यात सुरुवात झाली. शहरीभागातील वाटपाची सुरुवात नौपाडा येथील शिधा वाटप केंद्रात आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. याबरोबरच ग्रामीण भागातही शिधा वाटप केंद्रावरून किटचे वाटप सुरू झाले आहे.
दिवाळी सणानिमित्त राज्य शासनाच्या वतीने शिधावस्तूंचा संच अल्प दरात म्हणजेच शंभर रुपये प्रति संच या दराने अधिकृत शिधावाटप दुकानांमधून दिवाळी कालावधीत वितरीत करण्यात येणार येत आहे. जे शिधापत्रिकाधारक सध्या बायोमेट्रिक पध्दतीने अंत्योदय व प्राधान्य कुटुंब या योजनेअंतर्गत शिधाजिन्नस प्राप्त करीत आहेत, त्यांना या आनंदाचा शिधा योजनेचा लाभ मिळणार आहे. या संचामध्ये एक किलो साखर, एक किलो चणाडाळ, एक किलो रवा व एक लिटर पामतेल या वस्तूंचा समावेश आहे.
ठाणे परिमंडळातील उपनियंत्रक शिधावाटप कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील ठाणे, भिवंडी, नवी मुंबई, भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूर इत्यादी महानगर तसेच नगरपालिका क्षेत्रात या किटचे वाटप सुरू करण्यात आले आहे. या कार्यक्षेत्राच्या अधिपत्याखाली 12488 अंत्योदय व 599875 प्राधान्य शिधापत्रिका असे एकूण 612363 लाभार्थ्यांना या दिवाळी भेटीचा लाभ महाराष्ट्र शासनामार्फत मिळणार आहे.
जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील शिधा वाटप केंद्रातून आनंदाचा शिधा किटचे वाटपही आजपासून सुरू झाले आहे. त्यानुसार, ग्रामीण भागातील 1 लाख 55 हजार लाभार्थ्यांना या किटचा लाभ होणार आहे. आतापर्यंत 61 हजार किट प्राप्त झाले असून त्यापैकी 57 हजार किट शिधावाटप दुकानांमध्ये पोचले आहे. या किटचे वाटप सुरू करण्यात आले आहे. शिधावाटप दुकानांमध्ये किट पोचल्यानंतर त्याचे तातडीने वाटप सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिल्या आहेत.
या योजनेसाठी पात्र असलेल्या नागरिकांनी या किटचा लाभ घ्यावे, असे आवाहन उपनियंत्रक ज्ञानेश्वर जवंजाळ यांनी केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना‘आनंदाचा शिधा’ किटचे वाटप सुरू
Reviewed by ANN news network
on
१०/२०/२०२२ ०६:५१:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/२०/२०२२ ०६:५१:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: